Ajit Pawar’s Viral Phone Call With Female Police Officer: सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदेशीर उत्खननावर कारवाई करत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या फोनदरम्यान या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना “तुम्ही थेट मला कॉल करायला पाहिजे होता,” असे म्हटल्यानंतर अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, अजित पवार यांच्या फोन कॉलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, महिला अधिकाऱ्याला केलेल्या या फोनवरून अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली असून, “उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का?” असा सवाल केला आहे.
फोनवर अजित पवार काय म्हणाले?
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबण्याच्या सूचना द्याव्या यासाठी अजित पवार यांना फोन केला होता. तेव्हा या महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून अजित पवार म्हणाले की, “मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय. मी तुम्हाला कारवाई थांबण्याचे आदेश देतो. तहसिलदारांना सांगा की, अजित पवार यांचा फोन आला होता. मला उपमुख्यंत्र्यांनी कारवाई थांबण्यास सांगितले आहे.”
यावर या महिला पोलीस अधिकारी अजित पवार यांना, “सर, तुम्ही थेट माझ्या फोनवर कॉल करा ना.” अधिकाऱ्याच्या या वाक्यानंतर अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. ते या अधिकाऱ्याला म्हणाले की, “मी तुमच्यावर कारवाई करने. तुम्हा मल सांगत आहात की, थेट कॉल करा. तुमचा नंबर द्या मी कॉल करतो.”
एका उपमुख्यमंत्र्यांना हे शोभतं का?
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दमानिया म्हणाल्या की,”महिला अधिकारी आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? तुझे डेरिंग कसे झाले. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? याबद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे.”