पार्थ पवार हे जमीन व्यवहारांमुळे अडचणीत आले आहेत. दरम्यान अजित पवार यांनीही याबाबत भूमिका मांडली. दरम्यान अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल असा दावा आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसंच अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांना कुठलीही क्लिन चीट मिळालेली नाही असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

सूर्यकांत येवलेना अटक करा सगळं सत्य बाहेर येईल-अंजली दमानिया

पार्थ पवार यांना कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही. ज्या दिवशी सूर्यकांत येवलेला पोलीस ठाण्यात आणण्यात येईल तेव्हा तो सगळं बाहेर काढेल. पार्थ पवारचं नाव घेईल, अमेडिया इंटरप्रायजेसचं नाव घेईल. सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेचा जामीन मंजूर झाला आहे. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की येवलेला अटक करा. १६ तारखेला बॉटेनिकल गार्डन्सकडून पत्र लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगितलं ही जागा आमची आहे ही जागा रिकामी करा. हे सांगितलं गेलं. ही माणसं पोलीस ठाण्यात गेली. त्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस पाठवा. त्यानंतर तिथे गेल्यावर त्यांना माहिती मिळाली की कुठलीही कागदपत्रं नव्हती तरीही अमेडियाच्या माणसांनी दादागिरी केली. बाऊन्सरही घेऊन गेले होते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल-अंजली दमानिया

आता अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. कारण पोलीस स्टेशन डायरीतले उल्लेख मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. १६ जून २०२५ दुपारी ४ वाजून २८ मिनिटांनी उपरोक्त विषयान्वये आम्ही मुंढवा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मुंढवा पोलीस ठाण्यात हे कळवण्यात आलं की अॅड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करुन आमच्या सिक्युरीटी लोकांना बॉटेनिकल गार्डनमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे पोलिसांची कुमक पाठवा. अधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह सदर ठिकाणी गेलो. त्यावेळी बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम (वय-५७), महेश पुजारी आणि फिल्ड ऑफिसर सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस यांचे चार गार्ड हजर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेश मोरे यांनी नियुक्ती केली आहे. पण ती जागा बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने बाळासाहेब कदम यांनी सांगितलं. अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला त्यांनी पोलिसांना फोन केला. जागा रिकामी करुन घ्या अशी मागणी करतात. आता मला मोठी मागणी करायची आहे. की या दरम्यान पार्थ अजित पवार यांचं टॉवर लोकेशन कुठे होतं? हे कळलं पाहिजे. त्यांचा सीडीआर मागवला जावा. अडीच किमी अंतरात ते कुठे होते याचा शोध लागेल. उद्या जाऊन पोलिसांनी सूर्यकांत येवलेंना अटक करावी. त्यांचे जबाब नोंदवून घ्यावे. या सगळ्याचा उलगडा झाला तर सगळे घोळ आपोआप समोर येतील. पार्थ पवारांना कुठलीही क्लिन चिट मिळालेली नाही.

पार्थ पवार प्रकरणात राजकीय दबाव होता-अंजली दमानिया

पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने जो व्यवहार केला त्यात फक्त कागदपत्रंच नाही तर पोलिसांवर दबाव आणला. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. कुठलाही साधा व्यवहार नाही. राजकीय प्रभाव होता, बळाचा वापर झाला होता. या सगळ्या गोष्टींमुळे अजित पवार यांनी आता तरी पुण्याच्या पालक मंत्रिपदाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.