Sanjay Shirsat Viral Video : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर करत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट यांच्याबद्दल गंभीर दावे केले आहेत. या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार शिरसाठ हे हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसल्याचा दावा या व्हिडीओच्या माध्यमातून केला जात आहे, मात्र शिरसाठांनी हा व्हिडीओ त्यांच्या घरातील बेडरूमधील असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात?” असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

राऊतांचे गंभीर आरोप

राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंत्री संजय शिरसाट एका खोलीमधील बेडवर बसून फोनवर बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये बेडशेजारी एक बॅग, संजय शिरसाट यांचा पाळीव श्वान देखील दिसत आहे. शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आयकर विभागाच्या नोटिशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

“मंत्री संजय शिरसाट एका हॉटेलमधील खोलीत बेडवर बसले आहेत आणि त्यांच्या बाजूला नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगा दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरसाटांवर कारवाई करणार का?” असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान शिरसाट यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “तो व्हिडिओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवासातून आल्यानंतर बेडवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेथे माझे श्वानही आहे. प्रवासातून आल्यानंतर माझी कपड्यांची लटकलेली बॅग दिसतेय, त्याची बातमी होते, याचं मला आश्चर्य वाटते.”

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

“मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असतांना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात? मी त्या व्हिडीओला झूम करून फोटो काढला आहे. “हा माझ्या घरच्या वीडियो आहे “ असे ते म्हणत आहेत… त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावे की जी रूम व्हिडीओमध्ये दिसत आहे ती खरंच त्यांच्या घरची आहे. मला ह्यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की कोणाच्याही बेडरूममध्ये CCTV लावणे अतिशय चुकीचे आहे,” असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. याबरोबरच त्यांनी को व्हिडीओ आणि त्याचा स्क्रिनशॉट देखील पोस्ट केला आहे.