Anjali Damania Reaction on Dhananjay Munde statement : कृषी क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. सनसनाटी निर्माण करण्याकरता आणि माध्यमांत चर्चेत राहण्याकरता त्यांनी असे आरोप केले असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला. यावरून आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांवरील कागदपत्राचं वाचनच त्यांनी करून दाखवलं.

अंजली दमानिया या आरोप करून सनसनाटी निर्माण करतात. मात्र, त्यांनी केलेले सर्व आरोप धांदात खोटे आहेत, सनसनाटी निर्माण करण्याच्या पलिकडे त्या आरोपात काही नाही. पण अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करण्याचं काम ज्यांनी कोणी दिलं असेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच, अंजली दमानिया या बदनामिया आहेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

या आरोपांवर अंजली दमानिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मला वाट्टेल ती नावं ठेवली. दमानिया नाही तर बदनामिया म्हटलं. खरंतर त्यांनी मला पुराविया म्हणायला हवं होतं. बदनाम लोकांना मी पुरावे देत असेन तर मला काहीही नाव चालेल. त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू द्या. पण मी एक एक पुरावे बाहेर काढून तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. कराडबरोबर जेवढा वेळ घालवलात त्याच्या एक टक्का तरी मंत्री म्हणून बसला असता तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते”, असं अंजली दमानिया म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी सर्व जीआर आणि त्यांच्याविरोधातील पुराव्याचं वाचन केलं.

नेमकं प्रकरण काय?

“एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देतं, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो”, असा दावा करत अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा लेखोजाखा त्यांनी आज मांडला. त्यावर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सर्व दावे फेटाळून लावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज ५८ दिवस झाले आहेत माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. हा मीडिया ट्रायल का सुरु आहे? कोण चालवत आहे? हे मला माहिती नाही. आज अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यामध्ये डीबीटीमध्ये काय असावं? काय नसावं? कोणतीही बाब डीबीटीमधून वगळण्यासाठी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असते. मी कृषीमंत्री असतानाही त्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.