Anjali Damania on Husband Anish Damania joins MITRA : राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणणाऱ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आणि त्या आरोपांशी संबंधित कथित पुरावे सादर करून खळबळ उडवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या थिंक टँकमध्ये वर्णी लागली आहे. महाराष्ट्र सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणाऱ्या आणि धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ‘महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एका बाजूला अंजली दमानिया राज्य सरकारमधील विविध कथित भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या घटना उजेडात आणून खळबळ उडवून देत असतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे पती अनिश यांची सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागल्यामुळे दमानिया यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या टीकेला अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया म्हणाल्या, “मी देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करते. आता माझे पती देखील देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत. त्यांच्याकडे पाच पदव्या आहेत. त्यांच्या कामाचा अनुभव पाहून सरकारने त्यांना हे सल्लागारपद स्वीकारण्याची विनंती केली होती, जी अनिश यांनी स्वीकारली आहे.”

माझ्यासाठी ही अभिमानास्पद बाब : अंजली दमानिया

“माझे पती जे. एम. फायनॅन्शियल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मूख्य कार्यकारी अधिकारी होते. आता ते कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी ऑफ जेएम फायनॅन्शियल ग्रुप अँड रिलेशनशिप्स ग्लोबल प्लॅटफॉर्म) झाले आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची भेट घेतली होती. त्यावेळी गोयल यांनी अनिश यांना विनंती केली की तुम्ही ‘फिक्की’ या समितीचे सदस्य व्हा. कॅपिटल टार्गेटचे सगळे लोक फिक्की समितीचे सदस्य असतात.”

“गोयल यांच्या विनंतीवरून अनिश यांनी फिक्कीचं सदस्यत्व स्वीकारलं”

“जे. एम कंपनीचे तीन जण फिक्कीचे सदस्य आहेत. अशातच गोयल यांनी अनिश यांना विनंती केली की त्यांनी फिक्कीचं सदस्यत्व घ्यावं. गोयल यांच्या विनंतीचा मान ठेवून अनिश फिक्कीचे सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी मित्रा या समितीचं सदस्यत्व स्वीकारलं. त्यानंतर अनिश यांनी अभिमानाने ही बातमी समाजमाध्यमांवर शेअर केली. मी देखील त्यांची पोस्ट सर्व समाजमाध्यमांवर शेअर केली. कारण यात लपवण्यासारखं काहीच नाही. गुरुवारी ‘मित्रा’ने लिंक्डइनवर, शुक्रवारी अनिशने फेसबूकवर आणि पाठोपाठ मी देखील फेसबूकवर ही बातमी शेअर केली.

दमानिया यांचे वार्ताहरांवर आरोप

अंजली दमानिया म्हणाल्या, “दोन पत्रकारांनी या नियुक्तीचा वाट्टेल तसा अर्थ काढून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. ‘अंजली दमानियांच्या पतीला राज्य सरकारकडून काहीतरी मिळालं आहे’, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसं नाहीये. माझे पती त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर तिथे आहेत. ते राजकारणापासून दूर राहून देशासाठी काम करत आहेत. त्यासाठीच त्यांनी ‘फिक्की’ व ‘मित्रा’ची सदस्यता स्वीकारली. मानद सल्लागार म्हणून ते आता या समित्यांमध्ये असतील आणि राज्य सरकारला मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे एकही रुपया न घेता ते ही सगळी कामं करणार आहेत. ते केवळ कॅपिटल मार्केटमध्ये सल्ला देण्याचं काण करणार आहेत.”