Anjali Damania Targets Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या घटनेमुळे चर्चेत आहेत. सोलापुरातल्या कुर्डूगावात अंजना कृष्णा नावाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याशी फोनवर अरेरावी पद्धतीने संवाद केल्याचा आरोप अजित पवारांवर ठेवण्यात आला होता. या प्रकारावर अजित पवारांप्रमाणेच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवारांबाबतचे जुने व्हिडीओ शेअर केले असून त्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

अंजली दमानियांनी शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्याआधी केलेली विधाने दिसत आहेत. “एनसीपीवर जवळजवळ ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सिंचन घोटाळा. आता देशाला ठरवायचंय की या घोटाळ्यांच्या गॅरंटीचा देश स्वीकार करणार आहे का?”, असं मोदी एका भाषणात म्हणताना दिसत आहेत.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस २०१४ च्या निवडणुकांवेळी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. “७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग, पिसिंग. स्पष्टपणे तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर ठपका ठेवलाय. १४ हजार पानांचे पुरावे मी आणि विनोद तावडेंनी त्यांना नेऊन दिले आहेत. भ्रष्टाचाऱ्याला पाठिशी घालणाराही तेवढाच दोषी आहे जेवढा भ्रष्टाचार करणारा दोषी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणतानाचे व्हिडीओ यात आहेत.

मोदी व फडणवीसांचे हे व्हिडीओ एकीकडे चालत असताना दुसरीकडे ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यातील दृश्य दिसत असून त्यात अजित पवारांसह खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.

अंजली दमानिया म्हणतात, कसा विश्वास ठेवायचा?

दरम्यान, या व्हिडीसोबत केलेल्या पोस्टमध्ये अंजली दमानियांनी सवाल उपस्थित केला आहे. “सिंचन घोटाळ्याची दाबून टाकलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याची हिंमत सरकार दाखवणार का? ‘घोटाले के गॅरंटी को देश स्वीकार करेगा?’ म्हणणारे आपले पंतप्रधान काय किंवा ‘सिंचन घोटाळ्यामधे अजित दादांची अवस्था मी काय करणार? तर अमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग, पिसिंग अॅण्ड पिसिंग’ म्हणणारे आपले मुख्यमंत्री काय…राजकारणी कधी खरं बोलतात का? कसा विश्वास ठेवायचा जनतेने ह्यांच्या बोलण्यावर ?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.