सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनासमोर ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी शड्डू ठोकून उभे राहिलेले छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं अंजली दमानिया यांनी गुरुवारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या ट्वीटवर दमानिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यानुसार, भाजपाकडून छगन भुजबळांना प्रमोट केलं जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

अंजली दमानियांचं आधी ट्वीट..

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आक्रमकपणे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडत आहेत. काही वर्षांपूर्वी अजंली दमानिया यांनी छगन भुजबळांवर आक्रमकपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्वीटमध्ये भुजबळांवरील आरोपांचा संदर्भ घेत भाजपाला लक्ष्य केलं आहे. “भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?” असा प्रश्न अंजली दमानिया यांनी एक्स (ट्विटर)वरील पोस्टमधून उपस्थित केला आहे.

..आता पोस्टवर स्पष्ट केली भूमिका!

दरम्यान, हे ट्वीट व्हायरल होऊ लागल्यानंतर अंजली दमानियांनी त्यावर त्यांची नेमकी भूमिका टीव्ही ९ शी बोलताना स्पष्ट केली आहे. “काही दिवसांपूर्वी मला कुणीतरी सांगितलं होतं की भुजबळांना भाजपा ओबीसी चेहरा बनवणार आहेत. फक्त राज्यातच नाही, तर देशभरात त्यांना तसं प्रमोट केलं जाणार आहे. मागे मंडल आयोगाच्या लढ्याच्या वेळी भुजबळांनी दिलेलं योगदान बरंच मोठं होतं. त्यामुळे भुजबळांना तसं करायचं भाजपाचं ठरलंय. त्यामुळे मला जेव्हा हे पुन्हा कळलं, तेव्हा फार विचित्र वाटलं”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

“भाजपा भ्रष्ट माणसाला पुन्हा मोठं करतेय”

“मनोज जरांगे पाटील हे एक साधे शेतकरी होते. ते जर एवढा मोठा लढा देऊ शकतात, तर भुजबळांसारख्या चेहऱ्याची भाजपाला गरज का पडावी? म्हणून मी काल ते ट्वीट केलं. ते भाजपाच्या वाटेवर नक्कीच आहेत. पण एखादा साधा व्यक्ती, साधा एखादा ओबीसीही लढा देऊ शकला असता. पण तसं न करता अशा भ्रष्ट माणसाला भाजपा पुन्हा मोठं करतेय. ज्यांच्याविरुद्ध भाजपानं एकेकाळी पीआयएल केलं होतं. मी आम आदमी पार्टीत असताना जसे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तसेच किरीट सोमय्यांनीही केले होते. ते आता गेलं कुठे? कुठेतरी हे राजकारण पाहून फार वेदना होत आहेत”, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

“छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर?” ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, कुणी उपस्थित केलाय हा प्रश्न?

“भुजबळांना थेट पक्षात…”

“अजित पवार व त्यांच्याबरोबर पूर्ण फौज भाजपानं सोबत घेतली. या सगळ्या रथी-महारथींना भाजपानं सोबत घेतलंय. त्यात आता भुजबळांना थेट पक्षातच घेतलं जाणार असल्याचं कळल्यावर मला फार विचित्र वाटलं”, असं अंजली दमानिया यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिखर बँक घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांनी अजित पवारांना क्लीनचिट दिली आणि रोहित पवारांची काल ९ तास चौकशी केली. तुम्ही भ्रष्टाचारावर केली जाणारी कारवाई सगळ्यांवर समान घेतली गेली पाहिजे. जे चाललंय ते अतिशय भयानक चाललंय”, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.