अहिल्यानगरः माझ्याबरोबर एकेकाळी दारूच्या विरोधात लढा देणारे अरविंद केजरीवाले दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दारू व्यवसाय, दारूचे दुकानांना परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले. सत्ता मिळवल्यानंतर समाजसेवा करण्याऐवजी सत्ता व पक्षाची हवा त्यांच्या डोक्यात गेली. दारूमुळेच जनतेने त्यांना नाकारले अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे बोलताना व्यक्त केली.

अण्णा हजारे म्हणाले, सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांच्याकडे आशेने पाहिले जात होते. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया समाज, देशासाठी आमच्याबरोबर आले याचा आनंद वाटत होता. परंतु त्यांनी पक्ष काढला, तेव्हा तेथेच माझा व त्यांचा संबंध संपला. त्यांनी दारूच्या दुकानांना व व्यवसायाला परवान्याचे धोरण स्वीकारले. तेथेच त्यांचा पराभव झाला. दारू पिल्यामुळे कुणी पहेलवान होत नाही. झालाच तर कर्करोग क्षयरोगच होतो. परंतु सत्ता, पक्ष, पैसा याची हवा त्यांच्या डोक्यात गेली. ज्या दिवशी त्यांनी पक्ष स्थापन करण्यासाठी बैठक बोलावली, त्यापूर्वी मी त्यांना वेळोवेळी समजावत होतो. परंतु त्यांनी ऐकले नाही, याकडे हजारे यांनी लक्ष वेधले. पाच वर्षानंतर मी परत येईल, असे जरी अरविंद केजरीवाल म्हणत असले तरी परत आल्यानंतर समाजसेवा, देशसेवा करण्याची अपेक्षा त्यांनी ठेवावी. दारूच्या धोरणाला नकार द्यावा. तरच तुमच्याकडे अपेक्षेने पाहिले जाईल, असाही सल्लाही अण्णा हजारे यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केजरीवाल मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार हे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात गेले, याचाही परिणाम निवडणूक निकालावर झाला का?, यासंदर्भात बोलताना हजारे म्हणाले, आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याचे स्पष्टीकरण देऊन जनतेला ते चुकीचे की बरोबर हे सांगितले गेले पाहिजे. परंतु ते घडले नाही. आता मी त्यांना कोणताही सल्ला देणार नाही, कारण वेळ निघून गेली आहे.केजरीवाल व सिसोदिया यांच्या विषयी बोलताना अण्णा हजारे काही वेळ भावूकही झाले होते.