हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आता रायगड जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात आहेत. अलिबाग तालुक्यातील आमदार महेंद्र दळवी यांचे खंदे समर्थक राजा केणी यांची शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर रायगड जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख पदाची सूत्र प्रमोद घोसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राजा केणी हे विविध सामाजिक आणि सेवाभावी कार्यात अग्रेसर असतात. शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख म्हणून ते यापूर्वी कार्यरत होते. आमदार महेंद्र दळवी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दळवी समर्थक म्हणून त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांच्यावर उत्तर रायगडच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तर दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी प्रमोद घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोसाळकर हे गोगावले समर्थक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी शिवसेना दक्षिण रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख पदही भूषवले होते. मध्यंतरीच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन परत आले होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ अभियान राबवणार असल्याचे राजा केणी यांनी सांगितले. या पदाचा उपयोग पक्षाबरोबरच समाजासाठी कसा होईल याकडे लक्ष देणार असून आगामी काळात जिल्ह्यातील बेरोजगारी समूळ नष्ट करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे राजा केणी यांनी स्पष्ट केले.