२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यानंतर अडीच वर्षांनी हे सरकार पडलं. कारण एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड पुकारून थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. जेव्हा या सगळ्या घडामोडी घडल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं. की होय मी बदला घेतला. काही दिवसांनी तो शब्द त्यांनी मागे घेतला. मात्र उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्याचा बदला मी घेतला हे वक्तव्य जाहीर मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेत अजित पवारही आहेत. अजित पवारांना बरोबर घेऊन शरद पवारांचा बदला घेतला का? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

शरद पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे आणि असे अनेक संघर्ष महाराष्ट्रात झालेच

महाराष्ट्रात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाल्यास पवार-विरुद्ध पवार संघर्ष पाहण्यास मिळेल.. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पवार-विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीत पाहायला मिळू शकतो पण अशा गोष्टी राजकारणात होत असतात. शरद पवारांच्या आशीर्वादाने राज्यात मुंडे-विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला. त्यांच्या आशीर्वादाने असे अनेक संघर्ष राज्याने पाहिले. आता कालचक्र याचं उत्तर त्यांना देतं आहे बाकी दुसरं काही नाही असं फडणवीस म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातलं पवारपर्व होतं ते संपलंय का? हे विचारलं असता फडणवीस म्हणाले, “मी पर्व वगैरे मानत नाही. ते महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. आजही ते संघर्ष करत आहेत. मात्र आज देशातली परिस्थिती एकच आहे लोकांना एकच नेतृत्व योग्य वाटतं ते मोदी यांचं नेतृत्व आहे.”

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

“राजकारणात आम्ही एक गोष्ट शिकलो आहे की कुणी धोका दिला, विश्वासघात केला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. राजकारणात अपमानही केले जातात त्याकडे दुर्लक्ष करता येतं. पण जर कुणी तुमचा विश्वासघात केला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की मी शरद पवार यांचा बदला घेतला. पण माझ्याकडे संधी आली तर फायदा घेतला पाहिजे. माझ्याकडे संधी आली त्याचा फायदा मी घेतला. माझ्याबरोबर जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा कालचक्र त्याचं उत्तर देतं.”

संजय राऊत अजूनही बेशुद्ध आहेत का?

उद्धव ठाकरेंना बरोबर घ्यायचं जाळं टाकत आहेत. संजय राऊत अजूनही बेशुद्धच आहेत का? त्यांना अजूनही हॅलोसिनेशन्स होतात का? आमच्याकडे दिल्लीत असे काही नेते नाहीत जे जाळं घेऊन फिरतात. महाराष्ट्राचा काही विषय असेल तर मला विचारलं जातं. महाराष्ट्राचा विषय असेल तर मला विचारलं जातं. त्यामुळे मला अद्याप कुणी विचारलेलं नाही की उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं का? त्यामुळे उद्धव ठाकरेंवर अशा प्रकारे जाळं टाकण्यात आलं आहे हे स्वप्न जरी संजय राऊत यांना पडलं असलं तरीही तसं काहीही घडलेलं नाही.

“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीबरोबर गेले तेव्हाच

उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्याचदिवशी लोकांचा उद्धव ठाकरेंवरचा विश्वास उडाला. बाळासाहेब ठाकरेंवर जो विश्वास जनतेने टाकला होता तशी उद्धव ठाकरेंची आता विश्वासार्हता उरलेली नाही. मतभेद संपवता येतात, मनभेद संपवणं कठीण असतं. रोज उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली, शब्द वापरले, त्यांच्या सरकारमध्ये माझ्यासहीत सगळ्यांना टार्गेट केलं आहे त्यामुळे आता मनभेद झालेत त्यामुळे त्यांना बरोबर घेणं शक्य आहे असं मला वाटत नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.