आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये येऊन सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार केला. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. तसंच उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे नकली शिवसेना आहे असाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. याच प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करत राहुल गांधींचा उल्लेख नादान असा केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मला अतिशय आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सुरुवात चंद्रपूरपासून केली. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत आपला विजय कुणीही थांबवू शकत नाही. आपण सगळ्यांनी आई महाकालीला नमन केलं आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

हे पण वाचा- “काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली, एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरे यांचे..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

त्या नादान राहुल गांधींना जाऊन सांगा..

“एकीकडे आई महाकालीला नमन करणारा आपला पक्ष आणि आपली महायुती आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात ‘मुझे हिंदू समाजमें जिसे शक्ती कहा जाता है उस शक्ती को समाप्त करना है.’ अरे नादान राहुल गांधींना सांगा, आई महाकालीला समाप्त करण्याचं स्वप्न धुळीला मिळेल. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत आमची शक्ती कुणीही संपवू शकत नाही. कारण शक्ती म्हणजे आई आहे. ज्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला राहुल गांधी संपवू शकणार नाहीत. आज मोदींच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रयान मोदींच्या आशीर्वादाने चंद्रावर पोहचलं

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं. आता चंद्रपूरचं यान हे माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात थेट संसदेत उतरेल त्याच यानात अशोक नेतेही बसलेले असतील. तुमच्या आशीर्वादाने हे दोन नेते तुमच्या आशीर्वादाने लोकसभेत पोहचतील. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.