जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सोमवारी (२५ जुलै) दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे खोतकरांनी एकनाथ शिंदेंचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठींबा दिला आहे,” अशी माहिती शिंदे गटाने दिली.

दिल्लीत अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तेव्हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राहुल शेवाळे, खासदार रोहिदास लोखंडे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार धैर्यशील माने, खासदार कृपाल तुमाने आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते.

शिंदे गटातील प्रवेशाबाबत खोतकरांचं म्हणणं काय?

अर्जून खोतकर म्हणाले, “हे खरं की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी दिल्लीला आलो आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमावरून आले आणि योगायोगाने आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा होतेच. मात्र, त्याचे वेगळे अर्थ काढू नये. मी शिंदे गटात जाण्याबाबत काहीही निर्णय बदललेला नाही.”

“माझी एकनाथ शिंदे यांच्याशी केवळ भेट झालीय. भेट झाली याचा अर्थ मी पक्ष बदलला असा होत नाही. मी शिवसेनेतच आहे,” असंही अर्जून खोतकर यांनी नमूद केलं. असं असलं तरी भविष्यातही शिवसेनेतच राहणार का? यावर खोतकरांनी उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी पुनर्नियुक्ती

एकनाथ शिंदेंना ५० आमदारांच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील पाठिंबा जाहीर केला. तसेच संसदेतील आपला गटनेता बदलला. यानंतर खासदारांवर देखील पक्षाकडून कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?”; संजय राऊतांकडून मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतीच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी आज खासदार प्रतापराव जाधव यांची पुन्हा एकदा बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी पुनर्नियुक्ती केल्याचे जाहीर केले.