संगमनेर :  शेतकरी मुलांचे लग्न होत नसल्याने त्यांचे लग्न जमवून देतो, या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्या एका भोंदूबाबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी चांगला धडा शिकवला. कोपरगाव येथील एका भोंदूबाबाला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुक्यातील चिखली येथे पोलिसांच्या हवाली केले. मल्लीआप्पा ठका कोळपे (वय ४५) असे संशयित बाबाचे नाव आहे. बाबाच्या कार्यात त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आणखी दोघा सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी हरिभाऊ  उगले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील मल्लीआप्पा कोळपे हा बाबा मी खंडोबाचा भक्त असून माझ्याकडे शेतकरी मुलांचे लग्न जमविली जात असल्याचे सांगत भोंदूगिरी करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. उगले यांनी या भोंदूबाबाचे स्टींग ऑपरेशन करण्याचे ठरवले.

उगले यांनी शेतकरी मुलाचे लग्न होत नाही. घरात अडीअडचणी आहेत असे खोटे कारण सांगून भोंदूबाबाला संपर्क साधला. बाबाने सांगितले की, तुमच्या मुलाचे लग्न होण्यासाठी तुमच्या घरात काही विधी करावी लागेल. विधीसाठी सात हजार रुपये व गाडी भाडे असा दहा हजार रुपयांचा खर्च द्यायचे ठरले. याबाबतची उगले यांनी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे आणि संगमनेरचे उपअधीक्षक रोशन पंडित यांना दिली.

सापळा लावला

मंगळवारी (दि. ३१) या भोंदूबाबाला कोपरगावहून चिखली याठिकाणी संध्याकाळी सहाच्या सुमारास उगले यांच्या बहिणीच्या घरी बोलावण्यात आले. बाबा दोन साथीदारांसोबत चिखली याठिकाणी आला. उगले यांच्या बहिणीच्या घरात विधी करण्यासाठी पिशवीतील सर्व साहित्य जमिनीवर मांडले. त्यानंतर विधी करण्यास सुरुवात केली. विधी सुरु असतानाच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, सागर धुमाळ, दत्तात्रय गोरे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव हे वेशांतर करुन त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे, अशोक गवांदे, काशिनाथ गुंजाळ, प्रशांत पानसरे यांनी भोंदूबाबासह त्याच्या दोघा साथीदारांना पूजा करताना रंगेहाथ ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत बाबाची चौकशी सुरु होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest fake baba marriage arrest akp
First published on: 02-01-2020 at 02:07 IST