जुळे सोलापूर परिसरातील गणेशभक्तांच्या सोयीसाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृंदावन पार्क गाळेधारकांनी कृत्रिम तलाव करुन त्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
सध्या सोलापूरकर दूषित पाणी पित आहेत. त्या पाण्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. या उदात्त हेतूची भावना डोळ्यासमोर ठेवूनच ओम कन्स्ट्रक्शनचे संचालक चंद्रकांत मणूरे, कृषी आयुक्त आबासाहेब साबळे, डॉ.संजय राठोड आदींच्या पुढाकाराने बठक बोलावून गणेश भक्तांना गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव व मूíतदान असे कार्यक्रम आयोजिण्याचे ठरले. त्यानुसार होटगी रस्त्यावरील चेतन फौंड्री समोर वृंदावन पार्क येथे कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे. याच कृत्रिम तलावात गणेशभक्तांनी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करावे. तसेच ज्यांना मूर्ती दान करावयाची आहे त्यांनी दान करावी, असे आवाहन संयोजक सूर्यकिरण भोसले यांनी केले आहे.
आतापर्यंत गणेशमूर्तीचे विसर्जन संभाजी (कंबर ) तलावात केले जायचे. परंतु या मोगलकालीन तलावातील पाणी अस्वच्छ आणि मलामिश्रित आहे. या दूषित पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करणे म्हणजे श्रीच्या मूर्तीची विटंबना करण्यासारखेच आहे. तसेच सध्याच्या गणेशमूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या असल्यामुळे त्यांचा रंग रासायनिक प्रक्रियेपासून दिलेला असतो. त्यामुळे या मूर्ती तलावात, विहिरीत, नदीत किंवा कोणत्याही वाहत्या पाण्यात सोडल्या तर ते पाणी प्रदूषित होते. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगामुळे जमिनीतील झरे कायमचे मृत पावतात. त्यामुळे ती जमीन नापीक होते. या गोष्टींचा विचार करुन कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याचे भोसले यांनी सांगितले.