आम्ही सर्व कायदेशीर प्रकिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे अपात्रतेबाबत कुठलीही कार्यवाही होईल, असं वाटत नाही. मात्र, तशी कुठलीही कारवाई झाली, तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

अरविंद सावंत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयानं दिलेले निर्देश विधानसभेच्या अध्यक्षांनी न्यायाधिकरण म्हणून काय केलं पाहिजेत? असे आहेत. न्यायालयाच्या ताशेऱ्यांमधून स्पष्ट होतंय की ते अपात्र होणार आहेत. अशावेळेला उपमुख्यमंत्री ते अपात्र होणार नाहीत, असं सांगतात. उपमुख्यमंत्र्यांना न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांपेक्षा जास्त अधिकार आहे का?”

हेही वाचा :  “प्लीज…”, संभाजीराजेंनी फोनवरून जरांगे-पाटलांना केलं आवाहन; नेमकी काय झाली चर्चा? वाचा…

“भाजपाच्या अधिकृत ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर ‘मी पुन्हा येईन’ असं म्हटलं. तासात ते ट्वीट डिलीट करण्यात आलं. याचा अर्थ धुसफूस असल्याचं स्पष्ट होतंय,” असं अरविंद सावंतांनी सांगितलं.

“पुन्हा येईन म्हणणारे उपमुख्यमंत्री झालेत. त्यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज आहे का? हा प्रश्न आहे. खोटे बोलणारे, कट कारस्थान करणारे, अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात होत चालली आहे,” अशी टीका सावंतांनी फडणवीसांवर केली.

हेही वाचा : हात थरथर कापतात, बोलताही येईना, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “मराठे…”

‘माझा गुणरत्न सदावर्तेंशी काही संबंध नाही’ असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. यावर अरविंद सावंत म्हणाले, “सदावर्तेंना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भडकावलं गेलं. दीड वर्षात एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण झालं का? सातवा वेतन आयोग लागू झाला का? सदावर्तेंना कुणी भडकावलं? पडळकर आणि खोत हे दोन नाXXX कुठं आहेत? सदावर्ते तुमचा माणूस असल्याचं जगाला माहिती आहे.”