scorecardresearch

“आर्यन खानचं अपहरण करुन…”; आणखी एक धक्कादायक खुलासा

समीर वानखेडे यांच्या विरोधात तक्रार करणारे वकील कनिष्ठ जयंत यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Aryan Khan kidnapped
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर तो तुरुंगात आहे.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर तो तुरुंगात आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून एनसीबीसह या संपूर्ण प्रकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच दरम्यान समीर वानखेडे यांच्या विरोधात तक्रार करणारे वकील कनिष्ठ जयंत यांनी देखील धक्कादायक खुलासा केला आहे. किरण गोसावी, मनीष भानुशाली, कुणाल जानी, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला, ऋषभ सजदेवा या सगळ्या लोकांना मोकळं रान समीर वानखेडेंनी दिलं, असा आरोप जयंत यांनी केला आहे. 

कनिष्ठ जयंत यांनी याबाबत पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे एफआयर दाखल करण्याची व चौकशी करण्याची मागणी केली आहे. कनिष्ठ जयंत म्हणाले, “या सगळ्या लोकांनी आर्यन खानचं अपहरण केलं, त्याला बेकायदेशीर कोठडीमध्ये ठेवलं. खंडणीसाठी आर्यन खानच्या कुटुंबीयांना आणि मॅनेजरला फोन केला. हा प्रकार संपूर्ण देशाने पाहला आहे. भारताच्या कोणत्याही नागरिकाचं स्वतंत्र्य बनावटगिरी करुन धोक्यात आणता येत नाही. एआयआर दाखल होण्याच्या १७ तास आधी किरण गोसावी सेल्फी घेतो आणि तो व्हायरल करतो. समीर वानखेडे आणि एनसीबीने सांगाव ही कुठली प्रक्रिया आहे.” 

“सॅनिटरी पॅड, स्मोकिंग पेपर अन्…;” प्रभाकर साईलने NCB च्या कार्यालयात नक्की काय पाहिलं?

संजय राऊतांनी देखील केली चौकशीची मागणी

“भाजपाचे नेते जे ईडीचा खेळ करत आहे ना त्यांनी या प्रकरणातसुद्धा मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. मी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाजूला बसलेली आहे ती सॅम डिसूझा आहे. तो मुंबईतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सर्वात मोठा खेळाडू आहे. तो मोठे राजकारणी, नेते, अधिकारी सर्वाचे मनी लॉन्ड्रिंग करतो असे म्हटले जाते. तो तिथे का बसला आहे? हा मोठा खेळ आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“जो साक्षीदार आहे त्याला काहीही होऊ देणार नाही. याप्रकरणाची संबंध फक्त मुंबईतच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. प्रभाकर साईलने खुलासे करुन देशावर मोठे उपकार केले आहेत. जे देशभक्तीच्या नावाखाली याप्रकारचे काम करतात त्यांना उघड करण्याचे काम त्याने केले आहे. आतापर्यंत नवाब मलिक यांनी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. मध्यातरानंतर मी खुलासे करणार आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अजून १० व्हिडीओ तुम्हाला मिळतील. भाजपाचे किती लोक या प्रकरणामध्ये आहेत हे तुम्हाला कळेल. किरण गोसावी कुठे आहे भाजपाला माहिती असेल. महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी या लोकांनी सोडलेली नाही. एनसीबीच्या कार्यालयामध्ये बसलेल्या सॅम डिसूझाचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात येते. माझी मागणी आहे याची चौकशी करावी,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 19:42 IST
ताज्या बातम्या