सांगली : पुराचे पाणी ओसरू लागताच नदीकाठी असलेल्या शेतशिवारात मगरी, विंचू आणि सापांचे साम्राज्य दिसू लागल्याने नदीकाठचे लोक धास्तावले आहेत. पश्चिम घाटात पावसाने विसावा घेतल्यानंतर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर पुराचे पाणी गतीने पात्रात परतत असताना हे प्राणी नदीकाठी विसावत असल्याचे निदर्शनास येत आहे. अजूनही कृष्णा व वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर असले, तरी पाण्याला उतार सुरू झाल्याने येत्या एक-दोन दिवसांत पुराचे पाणी पात्रात परतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मागील महापुराचा अनुभव असल्याने आणि प्रशासनाने सतर्क केल्याने अनेक कुटुंंबांनी निवारा केंद्रात वा पै-पाहुण्यांकडे आश्रय घेतला आहे.
पुराच्या पाण्यासोबत चिखल, काडीकचरा, पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भागात साचला आहे; तर सखल भागात अद्याप पुराचे पाणी साचले आहे. शेतामध्ये पाण्यासोबत वाहून आलेले ओंडके, झाडांच्या फांद्याही आहेत. हे दूर करण्यासाठी पूरग्रस्त भागातील नागरिक शेतात, घराकडे परतत आहेत. मात्र, ठिकठिकाणी मगर, साप आणि विंचवाचे दर्शन होत आहे. काहींना विंचवाने दंशही केला आहे. भिलवडी, औदुंबर, नागठाणे, आमणापूर परिसरात कृष्णेच्या महापुरासोबत यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर विंचू कुटुंबासोबत नदीकिनारी आले आहेत. यामुळे जमिनीवर पाय टाकताना या विंचवाकडून दंश होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागत आहे.
नदीकाठी असलेल्या जनावरांच्या गोठ्यातही मोठ्या प्रमाणात सर्प, विंंचू आढळून येत आहेत; तर ज्या ठिकाणी पुराचे पाणीही आले नाही, अशा घरांत विंचवाचे दर्शन होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे घरातील महिलावर्ग स्वच्छता करण्यास भीत आहे. स्वच्छता करत असताना कुठूनही विंचवाचा दंश होण्याची भीती असल्याने स्वच्छतेचे मोठे आव्हान आता पूर ओसरल्यानंतर निर्माण झाले आहे. याशिवाय अडगळीच्या ठिकाणी, जनावरांचे खाद्य ठेवलेल्या ठिकाणी सर्पांचेही दर्शन होत आहे. विंचू, सर्प यांच्या आश्रयस्थानात पुराचे पाणी शिरल्याने त्यांनी कोरड्या जागी स्थलांतर केल्यामुळे त्यांचे सहज दर्शन मानवी वस्तीनजीक होत असल्याचे आढळून येत आहे.
दरम्यान, नदीकिनारी मगरीही मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहेत. नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात त्या दिसत आहेत. शुक्रवारी सकाळी काही वेळ सूर्यप्रकाश पडला होता. या सूर्यप्रकाशात दोन मगरी नदीतून बाहेर येऊन उसाच्या शेताजवळ पहुडलेल्या आढळून आल्या. माणसांची चाहूल लागताच त्यांनी नदीपात्रात जाण्यास प्राधान्य दिले. महापुराचे संकट सध्या टळले असले, तरी आता मगर, विंचू आणि सर्पांचे नवे संकट पूरग्रस्तांसमोर उभे ठाकले आहे.