Ashish Shelar on Khalid ka Shivaji Selection for Cannes : ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. यावर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना “चित्रपटाबाबत केलेली मागणी आणि भावना या आम्हाला पूर्णपणे मान्य असून समजल्या आहेत” अशी टिप्पणी केली आहे. तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) याला प्रमाणित केले आहे. या गोष्टीचा फेरविचार करावा, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना केली आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनीच काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवासाठी पाठवण्याची घोषणा केली होती. त्यावरून आता शेलार यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागासाठी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निवड केलेला हा चित्रपट कान्समध्ये झळकला होता.

आशिष शेलार काय म्हणाले?

यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटामुळे भावना दुखावल्या आहेत तर हा चित्रपट कान्सला का पाठवला? यावर स्पष्टीकरण देताना शेलार म्हणाले, “हे खरं आहे की आपण हा चित्रपट कान्सला पाठवला होता. त्यासाठीच्या विशेष समितीने हा चित्रपट सुचवला होता. मी केवळ त्याची घोषणा केली होती. आता या चित्रपटासंदर्भात आपण चौकशी सुरू केली आहे. कान्सच्या यादीतून सरकारने हा चित्रपट काढून टाकला आहे. यासंदर्भात सरकारने कान्सला ईमेल पाठवला आहे. त्याचबरोबर सीबीएफसीने या सगळ्याचा पुनर्तपास केला आहे. कारण हा विषय त्यांच्या अखत्यारित येतो. सीबीएफसीने चित्रपटाशी संबंधित लोकांना नोटीस बजावली आहे.”

आशिष शेलार म्हणाले, “चित्रपटात काही असत्य दाखवल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर शासन त्यावर कारवाई करेल. शासन शिवप्रेमींबरोबर आहे. तसेच ज्या लोकांनी हा चित्रपट कान्सला पाठवला त्या समितीची चूक आम्ही दुरुस्त करू. त्यासाठी आम्ही काम सुरू केलं आहे. तसेच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांवर यासंदर्भातील सुनावणी करून कारवाई केली जाईल. ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे. तज्ज्ञ लोक ते काम पाहतात आणि निर्णय घेतात.”