Ashok Chavan Latest Updates : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी आपण आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर मी भाजपात कुठल्याही पदाच्या लालसेने आलेलो नाही. त्यामुळे पक्ष मला देईल ती जबाबदारी स्वीकारुन पूर्णपणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राज्याच्या विकासासाठी मी काम करणार आहे असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्यातून स्वतःला वाचवण्यासाठी भाजपात गेल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. भारतीय जनता पार्टी ही विरोधी पक्षांमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते. त्या आरोपांनंतर केंद्रीय संस्थांकडून चौकशी केली जाते. या काळात त्या नेत्यांवर भाजपात येण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप काँग्रेससह देशभरातील सर्वच विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. विरोधी पक्षांमधील नेत्यांना फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय आणि आयटीसारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. दरम्यान, भाजपाने श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं अन् भाजपात प्रवेश करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप चव्हाण यांच्या काँग्रेसमधील सहकारी आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित श्वेतपत्रिका सादर केली. अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या या श्वेतपत्रिकेत यूपीए आणि एनडीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची तुलना करण्यात आली आहे. या ५८ पानांच्या या श्वेतपत्रिकेत यूपीए सरकारच्या कार्यकाळाचे वाभाडे काढण्यात आले आहेत. यामध्ये यूपीए सरकारच्या कार्यकाळातील घोटाळे आणि त्यांची सद्यस्थिती यावर भाष्य करण्यात आलं आहे. या भागात आदर्श घोटाळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आलं होतं. त्यामुळे चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

हे ही वाचा >> भाजपा प्रवेशावरून टीका करणाऱ्यांना अशोक चव्हाणांचं उत्तर; म्हणाले, “मी इतकी वर्षे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी संजय राऊत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांना आणि भाजपा नेत्यांना प्रश्न विचारायला हवा की, आता आदर्श घोटाळ्याचं काय झालं?” भाजपा प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारल्यावर चव्हाण म्हणाले, तुम्ही हा प्रश्न विचारायला खूप उशीर केलात. आधीच हा प्रश्न विचारायला हवा होता. ‘आदर्श’बाबत उच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. काही संस्थांनी याप्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती आम्ही पूर्ण करू. हा सगळा राजकीय अपघात म्हणावा लागेल. मी आतापर्यंत याप्रकरणी अनेक गोष्टींना तोंड दिलं आहे. परंतु, हा चिंतेचा विषय नाही असं मला वाटतं.