देगलूर-बिलोलीत काँग्रेसचा मोठा विजय ; भाजपला  चपराक

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठा विजय प्राप्त करून काँग्रेस पक्षाने आपली जागा राखली. या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार असा जप भाजपने चालवला होता; पण काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी  भाजपला धक्का देत भाजपचे   स्थानिक नेते प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या चमूला सणसणीत चपराक लगावली. पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांची आता कोंडी झाली आहे.

भास्करराव पाटील खतगावकर यांचा वेगळा पवित्रा भाजपला धक्का देईल असे मानले जात होते. निवडणूक निकालानंतर ते स्पष्ट झाले आहे. खतगावकर यांनी भाजपला दिलेली सोडचिठ्ठी अशोक चव्हाण आणि काँग्रेससाठी लाभदायी ठरली, असे विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांना मिळालेल्या मताधिक्यावरून मानले जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातील नेत्याला भाजपत घेऊन त्याची उमेदवारी लादण्याचा प्रयोग पहिल्यांदा बापूसाहेब गोरठेकर यांच्या बाबतीत २०१९ मध्ये झाला होता; पण भोकरच्या मतदारांनी त्यांचा सपाटून पराभव केला. हेच गोरठेकर देगलूर पोटनिवडणुकीच्या काही दिवस आधी आपल्या मूळ पक्षात गेले. त्यावरून कोणताही बोध न घेता, भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या साबणेंना पक्षप्रवेशापूर्वीच उमेदवारीची बक्षिसी दिली खरी; पण मतदारांना, विशेषत: शिवसैनिकांना हा प्रयोग रुचला नाही. त्यांनी साबणेंचाही गोरठेकर करून टाकला.

वरील प्रयोगाची नेपथ्यरचना खासदार चिखलीकरांसह संघटन सरचिटणीस गंगाधर यशवंत जोशी, लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड यांनी साकारली होती. साबणे यांचे नाव त्यांनीच पक्षनेतृत्वाच्या गळी उतरविले होते. त्यामुळे या पराभवाची पूर्णत: जबाबदारी वरील तिघांवर येते, अशीही भाजपमध्ये चर्चा आहे. पण नेपथ्यरचनेमुळे भाजपचा अत्यंत मानहानीकारक पराभव झाला आणि पक्षातील या तीन जणांच्या ‘ऑटोशाही’चा निषेध म्हणून खतगावकर यांच्यासारखा अनुभवी, संयमी आणि राजकीयदृष्ट्या मुरलेला नेताही भाजपला गमवावा लागला. हा पराभव देवेन्द्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना बरेच इशारे देणाराही आहे. भाजपचे जिल्हाध्यक्षपद एखाद्या सक्षम-पक्षनिष्ठ माणसाच्या हाती असते, तर एवढी मानहानी झाली नसती. वरील तिघांसोबत जिल्हाध्यक्ष गोजेगावकर हेही या दारुण पराभवातले चौथे भागीदार मानले जात आहेत.

सत्ताधाऱ्यांची तयारी

काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक होणार, हे लक्षात घेऊन काँग्रेसने सहा महिन्यांपासून निवडणूक तयारी हाती घेतली. अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांना उमेदवारी देण्याचे तेव्हाच ठरले होते.

हा नवा उमेदवार तसा नाममात्र होता. तेथे खरी प्रतिष्ठा पणाला लागली ती अशोक चव्हाण यांची. आमदार अमरनाथ राजूरकर व डी.पी.सावंत यांच्यावर त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती; पण निर्णायक प्रसंगी भास्करराव खतगावकर, अविनाश घाटे यांनी काँग्रेस प्रवेश करून अपेक्षित यशाचे मोठ्या विजयात रूपांतर केले. चिखलीकरांच्या पुढाकाराने केलेल्या ‘साबणे प्रयोग’मुळे त्यांनी पक्षनेत्यांची, तीन केंद्रीय मंत्र्यांची नाचक्की केली.

निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर चिखलीकरांनी साबणेंच्या विजयाचा दावा केला होता. ते म्हणाले होते, या मतदारसंघातून २४ हजारांची आघाडी दिली होती. साबणेंना किमान तेवढे मताधिक्य मिळेल…’ पण देगलूरच्या मतदारांनी त्याहून खूप जास्त मतांनी साबणेंचा पराभव केला. या निवडणुकीत अनेक मुद्दे आले. जातीय समीकरणे आली, ‘वंचित’ने थोडीफार हवा निर्माण केली; पण मतदारांनी चव्हाण-खतगावकर यांच्यात जे नव्याने ऐक्य झाले, त्याच्या बाजूने कौल दिला.

खतगावकरांची हॅट्ट्रिक…देगलूर मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर मोठ्या मताधिक्याने जिंकले; पण यानिमित्ताने ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांनी एक ‘हॅट्ट्रिक’ नोंदविली. २०१४ साली सुभाष साबणेंना निवडून आणण्यात त्यांचा थेट हातभार होता; पण त्याच साबणेंनी नंतर रंग बदलल्याने २०१९ स्जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाची भाजपची योजना बारगळलाली भास्कररावांनी शेवटच्या टप्प्यात आपली ‘मतपेढी’ अंतापूरकरांच्या बाजूने वळवल्याच्या जुन्या नोंदी सापडतात आणि आता त्यांनी काँग्रेस प्रवेश करून जितेश यांच्या विजयात लक्षणीय योगदान देत काँग्रेस प्रवेश सार्थकी लावला.