मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली आहे. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षांमधील नेते मराठा आरक्षणावरून नकारात्मक वक्तव्ये करून मराठा समाजाचा रोष ओढवून घेत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी मराठा समाजाकडून आणि विरोधी पक्षांकडून होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

अशोक चव्हाण म्हणाले, राज्यातली परिस्थिती, मराठा समाजाच्या भावना आणि या उपोषणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. राज्य सरकारकडे उत्कृष्ट वकिलांची फौज आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा घातली आहे. त्यामुळे केंद्र सरकार यात लक्ष घालून निर्णय घेत नाही तोवर मार्ग कसा काढायचा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. हा प्रश्न सोडवण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं. लोकप्रतिनिधिंना काय म्हणायचं आहे, ते ऐकावं.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेरील वाहनांना आग लावल्याचा प्रकार नुकताच पाहायला मिळाला. त्यांच्या घरावर दगडफेकही झाली. अनेक ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. राज्यातली परिस्थिती चिघळत चालली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हा प्रश्न सोडवावा.

हे ही वाचा >> “आपल्या महाराष्ट्र पुत्राचा जीव…”, मनसेचा मराठा आंदोलकांना भावनिक संदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मुख्यमंत्री म्हणाले, मी मनोज जरांगे पाटलांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा थोडी मदत करावी. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आम्हाला, महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतोय. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडावं.