Ashok Chavan Latest Updates : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज भारतीय जनता पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व अशोक चव्हाणांनी स्वीकारलं. दरम्यान, भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच भाषणात अशोक चव्हाणांकडून एक चूक घडली. या भाषणात त्यांच्याकडून ओघाने काँग्रेसचा उल्लेख झाला.

अशोक चव्हाणांनी काल १२ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. ते भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. परंतु, दोन दिवसांत निर्णय जाहीर करू, असं अशोक चव्हाणांकडून जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान, आज सकाळपासूनच भाजपात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. तर, सकाळी ११ वाजता अशोक चव्हाणांनीच आजच्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती दिली.

हेही वाचा >> अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले; “आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस कारण..”

आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपाच्या कार्यालयात सुरुवात झाली. सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाणांचं भाजपात अधिकृत स्वागत केल्याचं निवेदन दिलं. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाणांच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर स्वाक्षरी केली आणि अशोक चव्हाणांना सुपूर्त केली. भाजपात अधिकृत प्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला मान्यवरांचे नाव घेऊन ते आभार मानत होते. यावेळी आशिष शेलार यांचा उल्लेख करताना ते मुंबई काँग्रेस अध्यक्ष असं म्हणाले. त्यांच्या तोंडून काँग्रेसचा उल्लेख आल्याने उपस्थित नेत्यांमध्ये हशा पिकला. ५० वर्षे काँग्रेसमध्ये असल्याने सवयीने तोंडून काँग्रेस निघालं असेल, असा उपहासही देवेंद्र फडणवीसांनी केला. तर, ५० वर्षांच्या सवयीमुळे काँग्रेस म्हणालो, असंही स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलं.

अशोक चव्हाणांना त्यांच्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी त्यांची चूक सुधारली आणि पुढच्या भाषणाला सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा. “