काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एक सूचक ट्वीट केलं आहे. एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांनी आपल्या मुलीच्या राजकीय पदार्पणाविषयी सूचक विधान केलं आहे. अशोक चव्हाणांनी केलेल्या या ट्वीटमुळे त्यांची धाकटी कन्या श्रीजया यांचा राजकारणात पदार्पण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. यावेळी तिने पदयात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणाबाबत सूचक संकेत दिले आहेत.

चव्हाणांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच असणार” या ट्वीटमधील पाखराच्या पिल्लाने आभाळात झेप घेण्याचा संदर्भ श्रीजयाच्या राजकीय प्रवेशाबाबत असल्याचं बोललं जात आहे.

खरं तर, मागील अनेक महिन्यांपासून श्रीजया अशोक चव्हाण यांच्या राजकारणातील पदार्पणाची चर्चा सुरू होती. कायद्याची पदवी संपादन केलेली श्रीजया गेल्या काही काळापासून वडिलांच्या ‘बॅक ऑफिस’ची जबाबदारी सांभाळते आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क आदी बाबींवर ती लक्ष ठेवते. मात्र, आजपर्यंत निवडणूक प्रचार वगळता तिने स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले होते.

हेही वाचा- ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याच्या आदेशाला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

भारत जोडो यात्रा जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आयोजनामध्ये त्या सक्रिय सहभागी झाल्या. यात्रेच्या स्वागतासाठी झळकलेल्या जाहिराती व फलकांमध्येही त्यांची छायाचित्रे होती. सहाजिकच भारत जोडो यात्रेतून त्यांचा राजकारणातील प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होतं. आता ही चर्चा आज अशोक चव्हाण यांच्या ट्विटमुळे खरी ठरताना दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavhan daughter shrijaya chavhan will join politics viral tweet with rahul gandhi bharat jodo yatra rmm
First published on: 08-11-2022 at 23:20 IST