सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सुनावणी पार पडणार आहे. यावर आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा असणार आहे. १६ आमदारांनी पळून जात पक्षाविरोधी काम केलं. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सर्वोच्च न्यायालयात नक्की होणार आहे. ती झाली तर सरकार कोसळणार, असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.
असीम सरोदे हे पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. शिवसेना पक्षचिन्ह आणि नावाच्या निर्णयासाठी आमदार, खासदारांचं बहुमत हा निकष असू शकतो का? हे विचारलं असता सरोदे यांनी सांगितलं की, “राजकीय पक्षांची दोन प्रकारे व्याख्या करण्यात आली आहे. पहिली म्हणजे मूळ पक्ष, दुसरी विधिमंडळ पक्ष. एकनाथ शिंदेंच्या गटाकडून विधिमंडळांचं बहुमत आपल्या बाजूनं असल्याचं सांगितलं जातं. पण, पक्षावर पकड असल्याचा शिंदे गटाचा दावा अपुरा आहे.”
हेही वाचा : “…तर कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते”; कायदेतज्ज्ञांचं मोठं विधान
“कारण, मूळ पक्ष कोणाच्या नावाने नोंद आहे, तेथील सदस्य कोणाच्या बाजूनं आहेत; हा महत्वाचा निकष ठरू शकतो. मूळ पक्ष हा शिवसेना म्हणून नोंद झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची नोंदणी आयोगाकडे आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात येत असलेला दावा कमकुवत आहे. केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे अथवा इतक्या मतदारांचा पाठिंबा आहे; म्हणून पक्ष कोणाचा ठरवणं संयुक्तिक ठरणार नाही,” असं स्पष्टीकरण असीम सरोदेंनी दिलं आहे.