सोलापूर : साप्ताहिक सुटीच्या दिवशी शेताकडे गेलेल्या एका सहायक फौजदाराचा शेतातील उसाला पाणी देताना विद्युत मोटारीतून विजेचा धक्का बसून जागेवरच मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे ही दुर्घटना घडली.
सिद्धाराम माणिक सोनार (वय ५६) असे मृत फौजदाराचे नाव आहे. त्यांची नेमणूक सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात होती. साप्ताहिक सुटीमुळे सोनार हे चपळगाव येथील घरी आले होते. या घटनेची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यानुसार मिळालेली अशी, सहायक फौजदार सोनार हे साप्ताहिक सुटीनिमित्त गावात आल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना दिवसभर घरीच थांबून मुलाच्या सोयरिकीचा विषय मार्गी लावण्याचा आग्रह धरला होता. परंतु सोनार हे ‘शेतात जाऊन येतो’ म्हणून गेले. उसाला पाणी देण्यासाठी विहिरीतील विद्युत मोटार सुरू केली आणि उसाला पाणी देत असताना अचानकपणे विजेचा तीव्र झटका बसला. यात ते जागेवरच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
इकडे सोनार हे घरी सायंकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांची पत्नी अर्चना आणि दोन्ही मुले काळजीत पडले. अखेर शेतात विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.