रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे खोल समुद्रात आंघोळीसाठी उरलेल्या अहमदनगर येथील पर्यटकांना बुडताना वाचविण्यात येथील जीवरक्षक आणि समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. अहमदनगर या ठिकाणाहून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी पाच तरुण आले होते. या पाच तरुणांपैकी रामहरी राजपूत (वय २५), किशन वाघमारे (वय ३०) व सुनील जाधव (वय २५) हे तिघेजण हे आंघोळीसाठी खोल समुद्रात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने व समुद्राच्या लाटांच्या जोरामुळे हे तिघे तरुण खोल पाण्यात ओढले गेले.
समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने त्यांना बाहेर निघणे अवघड झाले होते. या तिघांनी ही बचावासाठी आरडाओरडा केला असता, समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक उमेश म्हादे व अनिकेत चव्हाण यांनी तात्काळ समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांना या घटनेची माहिती देऊन समुद्राकडे धाव घेतली.
यावेळी जीवरक्षक उमेश म्हादे व अनिकेत चव्हाण यांनी व्यावसायिक ओंकार शेलार, फोटोग्राफर रुपेश पाटील, गणपतीपुळेचे उपसरपंच संजय माने यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन या तिन्ही तरुणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यानंतर या घटनेविषयीची माहिती गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राला देण्यात आली.
पोलिसांनी या घटनेची पाहणी करून बुडणाऱ्या तरुणांना वाचविण्यात धाडसी कामगिरी केलेल्या जीव रक्षक व स्थानिक व्यवसायिकांचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी घडलेल्या प्रकारांनतर गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांनी समुद्राच्या पाण्याची व लाटांची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात येत आहे.