दापोली – अनिल परब हा अर्धवट वकील आहे, विधिमंडळात मी ३२ वर्षे काम केले आहे. प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना ३५ ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतींना द्यावी लागते आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. मात्र या अर्धवट वकिलांनी तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे गुपचूप आरोप केले. त्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा असे आव्हान माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते खेड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, डान्सबार हा योगेश कदम यांच्याच मातोश्रींचा असल्याचा आरोप सारखा केला जात आहे, मात्र अनिल परब यांच्याविरुद्ध दोन दिवसांत हक्कभंग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल परब यांनी दादागिरीची भाषा करू नये, मी भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखवा, असे आव्हान माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिले आहे. मी राज्यातले सगळे डान्सबार बंद करण्याची मोहिम हाती घेण्यासाठी योगेश कदम यांना सांगणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
अनिल परब अर्धवट वकील आहे. विधिमंडळात मी ३२ वर्षे काम केले आहे. प्रत्येक नियमांची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना ३५ ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतींना द्यावी लागते आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. मात्र या अर्धवट वकिलांनी तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे गुपचूप आरोप केले. असे नियम तोडून जेव्हा आरोप केले जातात तेव्हा सदर बाब सभापती सभागृहाच्या पटलावर नियमाप्रमाणे ठेवत नाहीत, हा विधिमंडळाचा नियम आहे. आता हे अर्धवट वकिलाला माहिती नाही का? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. नियमबाह्य काम करुन हे आरोप करण्यात आले आहेत. अनिल परब यांच्यावर हक्क भंग आणणार अशी माहितीही रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, डान्सबार चालवण्याचे धंदे आम्ही कधी केले नाहीत. डान्सबार चालवून सर्वसामान्य माणसाचं जीवन उध्वस्त करण्याचे पाप आम्ही कधी केले नाही. योगेश कदम यांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचे पाप परब आणि उद्धव ठाकरे या दोघांनी दापोलीमध्ये केले पण तुम्हाला अपयश आले. उद्धव ठाकरे तर अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये सभा घेण्यासाठी आले होते. पण तिथे काही जमलं नाही. आणि आता विधान परिषद सभागृहात दिशाभूल करून खोटी माहिती देऊन तू कसला राजीनामा मागतोस? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा हा वाद आता राज्याला नवा राहिला नाही. त्यातूनच दोन्ही पक्षातील नेतेही एकमेकांविरुद्ध लढताना पाहायला मिळतात. आ. अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. मुंबईतील सावली डान्स बार हा गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर, राजकीय द्वेषापोटी हे आरोप करण्यात आल्याचे योगेश कदम यांनी म्हटले आहे.