Atharva Sudame Delete Reel after Objection by Brahmin Mahasangh : पुण्यातील रीलस्टार अथर्व सुदामे याने हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारं एक रील समाजमाध्यमांवर शेअर केलं होतं. ‘मूर्ती एक, भाव अनंत’ या कॅप्शनसह त्याने हा व्हिडीओ शेअर केला होता. यात एक हिंदू तरुण मुस्लीम मूर्तीकाराकडून गणेश मूर्ती खरेदी करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र, यावर ब्राह्मण महासंघासह इतर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अथर्वने समाजमाध्यमांवरून त्याचं रील हटवलं. तसेच सर्वांची माफी देखील मागितली आहे.
अथर्वच्या रीलनंतर जयसिंह मोहन या फेसबूक पेजवरून एक पोस्ट करण्यात आली होती की “अथर्व सुदामेने काल जी काही घाण केली आहे त्याचे परीणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागणार आहेत. हा ओव्हररेटेड सोशल मीडिया कलाकार मला कधीच आवडला नाही, त्याने रीलच्या माध्यमातून आमच्या पुण्याची फार चुकीची ओळख करून दिली आहे.”
सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
दरम्यान, ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी देखील सुदामेवर संताप व्यक्त केला आहे. ते सुदामेला म्हणाले, “तू तुझा करमणुकीचा धंदा कर, लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर. यापेक्षा वेगळं काही करायला जाऊ नको. तुझा अभ्यास नसलेल्या गोष्टींमध्ये पडू नको. दुधात टाकलेली साखर ही साखरेचं काम करते की विषाचं काम करते ते गेल्या ७००-८०० वर्षांपासून हिंदू पाहत आणि भोगत आला आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्य, गणपती कसे बसवायचे, कोणाकडून घ्यायचे हा तुझा विषय नाही. तू त्यात लक्ष देऊ नको. हिंदूंना कळतं की कोणाकडून काय घ्यायचं, कधी घ्यायचं, कसं घ्यायचं. तू तुझा धंदा कर आणि तुझ्या सीमा मर्यादित ठेव.”
अथर्वने डिलीट केलेलं रील :
अथर्व सुदामेचा माफीनामा
यानंतर अथर्व सुदामे याने त्याचं रील डिलीट केलं आणि माफी मागणारा एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याने म्हटलं आहे की “मी एक व्हिडीओ माझ्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केला होता. मात्र, तो मी दुपारी डिलीट केला आहे. तो व्हिडीओ पाहून काही लोक नाराज झाले. काहींना तो व्हिडीओ आवडला नाही. परंतु, कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. हिंदू सणांवर, मराठी संस्कृतीवर आणि आपल्या भाषेबद्दल आतापर्यंत कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरने जितके व्हिडीओ तयार केले नसतील तेवढे व्हिडीओ मी केले आहेत. परंतु, ते करत असताना माझ्या मनात अजिबात कुठलाही वाईट हेतू नव्हता. तरी कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो. तसेच आतापर्यंत माझ्यावर जसं प्रेम केलंत ते कायम ठेवा.”