पारनेर : राज्यात सातत्याने महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. या हत्या, अत्याचार वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालुक्यातील जवळे येथील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाची सोमवारी वाघ यांनी भेट घेतली. या वेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटुंबीयांकडे सूपूर्द केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे, कृष्णकांत बडवे, नगर शहराध्यक्ष भैया गंधे, नवनाथ सालके, अमोल मैड, बबनराव आतकर, महेंद्र आढाव, शेखर सोमवंशी, जवळ्याच्या सरपंच अनिता आढाव, सोनाली सालके, गजानन सोमवंशी, प्रभाकर घावटे आदी यावेळी उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या की, राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतून अत्याचार झालेल्या महिलांना,मुलींना आर्थिक मदत करण्यात येते. त्याच धर्तीवर अत्याचार व हत्या झालेल्या महिला व मुलींच्या कुटुंबीयांना सरकारने मदत मदत द्यावी.  या घटनेला सहा दिवस झाले तरी अद्याप गुन्हेगारांचा शोध लागला नाही ही चिंतेची बाब आहे. आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल अश्या पध्दतीने तपास करण्याची मागणी वाघ यांनी केली. पीडितेच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या कोणालाच या प्रकाराबाबत काही माहिती नाही का, शेजाऱ्यावर कोणाचा दबाव आहे का. कोणी दहशत निर्माण केली आहे का, अशी शंका श्रीमती वाघ यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पीडितेच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

आमचे कुटुंब मोलमजुरी करून जगणारे आहे. परिस्थिती हलाखीची आहे. असे असले तरी आम्हाला आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास लागावा, आरोपींना अटक व्हावी, खटल्याचा निकाल लवकर लागून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. माझ्या अश्राप मुलीला लवकर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. – पीडितेचे वडील

महिला,मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचारासंदर्भात पारनेर तालुक्यात यावे लागते हे दुर्दैवी आहे. येत्या आठ, दहा दिवसांत पीडितेच्या हत्येचा तपास लागला नाही तर आपण पुन्हा पारनेरला येऊन आंदोलन करू. पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. चित्रा वाघ,  प्रदेश उपाध्यक्षा, भाजप.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atrocities against women rising crime government failed bjp chitra wagh akp
First published on: 26-10-2021 at 01:47 IST