महाबळेश्वरच्या सहलीवर आलेल्या लोणी काळभोर (ता. पुणे) येथील भोरे नावाच्या पर्यटक दाम्पत्यावर आज (२५ एप्रिल) सकाळी मोटार सायकलवरून आलेल्या दोन आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात उदयोगपती व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्या गाडीचीही मोडतोड करून हल्लेखोर पसार झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही, मात्र व्यवसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.

तीन दिवसांपूर्वी लोणी काळभोर येथील उद्योगपती आपल्या पत्नीसह महाबळेश्वरच्या सहलीवर आले होते. मागील दोन दिवसांपासून या दाम्पत्याचा मोटार सायकलवरून आरोपी पाठलाग करीत होते. शनिवारी (२३ एप्रिल) हे दाम्पत्य कोकणात गेले होते. तेथेही मोटार सायकल स्वार या दाम्पत्याचा पाठलाग करीत होते. रविवारी (२५ एप्रिल) सकाळी हे दाम्पत्य बंगल्याच्या जवळ असलेल्या एमपीजी क्लब येथे स्पासाठी निघाले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या दोन मोटार सायकलस्वारांनी उद्योगपतीच्या गाडीच्या पुढील काचेवर रॉड मारून गाडी थांबवली.

पीडित उद्योगपतीकडून हल्ल्यानंतरही तक्रार देण्यास नकार

हल्लेखोरांनी गाडीतून उद्योगपती व त्याच्या पत्नीला बाहेर ओढून काढले आणि त्यांना जबरी मारहाण केली. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात पतिपत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या हल्ल्याची खबर महाबळेश्वर शहरात पसरली. महाबळेश्वर पोलिसांनी या हल्ल्याची दखल घेऊन संबंधित उद्योगपती बरोबर संपर्क साधला, परंतु उद्योगपतीने या संदर्भात आपली कोणतीही तक्रार नाही असे सांगितले.

हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याची माहिती उद्योगपतीने पोलिसांना दिली. हल्ला करणारे कोणाची माणसे आहेत याची आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्याला कोणतीही तक्रार दयायची नाही. दरम्यान, अशा प्रकारे हल्ला होणे ही महाबळेश्वर येथील कायदा आणि सुव्यवस्था किती घसरली आहे याचे उत्तम उदाहरण असल्याची चर्चा महाबळेश्वर शहरात सुरू आहे.

हेही वाचा : VIDEO: अचानक डोळ्यात मिरची पूड फेकत जबर मारहाण, भाजपाच्या डोंबिवलीतील समाज माध्यम प्रमुखावर हल्ला

महाबळेश्वर पोलिसांकडून तक्रार दाखल नसल्याने या दोघांचाही नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणीही महाबळेश्वर पोलिसांकडे याबाबत चौकशी झाल्याची माहिती मिळत आहे.