युग मुकेश चांडक हत्याकांडातील मुख्य आरोपी व फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला राजेश ऊर्फ राजू धनालाल दवारे याच्यावर मध्यवर्ती कारागृहात दहशतवादी हिमायत बेग याने खुनी हल्ला केला. डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१ सप्टेंबर २०१४ ला राजेश दवारे याने त्याचा मित्र अरविंद सिंग याच्या मदतीने युग चांडकचे अपहरण करून खून केला. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. हे दोन्ही आरोपी मध्यवर्ती कारागृहाच्या फाशी यार्डमध्ये कैद आहेत. याशिवाय फाशी यार्डमध्ये पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मिर्झा हिमायत बेग हा देखील कैद आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच महिला आणि दोन मुलांच्या खून प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला जितेंद्र नारायणसिंग गहलोत हा सुद्धा नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजता जेवणावरून हिमायत बेग आणि गहलोत यांचे राकेश मनोहर कांबळे या फाशीच्या आरोपीशी भांडण झाले. राकेश आणि त्याच्या मित्रांनी कळमेश्वर येथील लोणारा झोपडपट्टीतील रहिवासी कांचन मेश्राम हिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि खून केला होता. या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बेग आणि गहलोत याचे कांबळेशी भांडण सुरू असताना राजेश दवारे मध्ये पडला. या भांडणात बेग आणि गहलोत याने भाजी वाढण्याच्या मोठ्या चमच्याने राजेशच्या डोक्यावर वार केले.
यात तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर परिसरातील सुरक्षा रक्षकांनी सर्वांना पकडले आणि भांडण सोडविले. त्यानंतर राजेशवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बेग आणि गहलोत यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२४ अंतर्गत गुन्हा नोंदविला.



