जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रविवारी लातूर दौर्याच्या वेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद रात्री जालना शहरात उमटले. जिल्हयातील छावा संघटनेच्या कांही पदाधिका-यांनी रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जिल्हा कार्यालयावर पेट्रोलने भरलेली पेटती बाटली फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला.
यामुळे कार्यालयाच्या शटरचे नुकसान झाले. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे वाहनचालक संभाजी भुतेकर यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन कदीम जालना पोलिसांनी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप ताडगे, राधेश्याम पवळ यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
भुतेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आपण मुक्कामास असताना रविवारी रात्री अकराच्या सुमारास बाहेर मोठ्याने बोलण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आवाज आला. चार-पाच जण सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नावाने घोषणा तसेच शिवीगाळ करीत करताना दिसले.
कार्यालयाचे सुरक्षारक्षक पांडुरंग पडूळ यांच्या मदतीने आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी पेट्रोलने अर्धवट भरलेली बाटली पेटवून कार्यालयावर फेकण्यात आली. त्यामुळे कार्यालयांच्या शटरचे नुकसान झाले.
या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयास भेट देऊन तेथे पोलिस बंदोबस्त लावला. सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी मिर्झा अन्वर बेग, शेख महेमूद, संतोष ढेंगळे, अण्णासाहेब चितेकर, शिवचरण बाळराज यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात अध्यक्ष अरविंद चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.