भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना ‘सेकंड इनिंग’चे वेध लागले असून जानेवारीत पक्षांतर्गत काय घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे बारीक लक्ष आहे. पूर्तीतील गैरव्यवहाराच्या निमित्ताने नितीन गडकरींवर चिखलफेक करण्यात आल्यामुळे त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी टर्म धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ज्येष्ठांचे समर्थन या बळावर गडकरींना अडचण जाणार नाही, असेही चित्र समोर आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरी-मुंडे गटाशी चांगलेच जुळवून घेतल्याने त्यांना दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपदाची मुदतवाढ मिळणे फारसे अवघड दिसत नाही.
गडकरींना ‘क्लिन चीट’ देणारे भाजपच्या ‘थिंक टँक’मधील वजनदार नेते व स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक मंगळवारी नागपुरात येऊन गेले. गुरुमूर्तीचा नागपूर दौरा नियोजित होता. मात्र, संघ विचारांशी जवळीक साधणाऱ्या गुरुमूर्तीची सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी भेट होऊ शकली नाही. मोहन भागवत नागपूरबाहेर आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडेही मंगळवारी नागपुरात होते. प्रदेश भाजपाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली असून मुनगंटीवार विरोधी गट सक्रिय झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यापासून साऱ्याच गटांशी जुळवून घेतले आहे. गडकरी-मुंडे यांच्या समर्थकांशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. परंतु, विनोद तावडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष सोपवावे, असा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील लोकप्रिय आमदार असलेल्या मुनगंटीवारांचा कार्यकाळ जानेवारीत संपत असून १० जानेवारीला नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाईल.
महाराष्ट्रात गडकरी आणि मुंडे गट अस्तित्वात आहेत आणि ही वस्तुस्थिती भाजप नेते मान्य करतात. आगामी विधानसभा निवडणूक गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्त्वात लढविली जाण्याचे भाजपने जाहीर केल्याने प्रदेशाध्यक्ष आपल्या गटाचा असावा, यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. मुनगंटीवार यांची संघटनात्मक कामगिरी सरस ठरली आहे. अनेक आंदोलने त्यांनी यशस्वी केली आहेत. विधानसभेतही त्यांनी अनेक प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. तरीही त्यांच्याजागी विनोद तावडे यांची वणी लावावी, असा एका गटाचा प्रयत्न आहे. अचानकपणे विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर ही नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आली आहेत. जिल्हाध्यक्षपदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या जोडतोडीला वेग येईल, असे चित्र आहे.