प्रा. श्रीराम पुजारी जन्मशताब्दी वर्षपूर्तीची सांगता

सोलापूर : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांचे भावपूर्ण, परिपक्व गायन आणि प्रवीण गोडखिंडी यांच्या संमोहित करणाऱ्या बासरीवादनाने विद्यार्थिप्रिय शिक्षक, समाजधुरिण, सोलापूरचे सांस्कृतिक राजदूत प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीची सांगता झाली.

प्रा. श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी वर्षपूर्ती आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या सांगीतिक कार्यक्रमाचे हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

प्रवीण गोडखिंडी यांनी आपल्या बासरीवादन मैफलीची सुरुवात राग मारवाने केली. गायकी अंगाने वादन करताना विलंबित एकताल आणि द्रुत तीनताल अतिशय प्रभावीपणे सादर केला. रागातील बारकावे पेश करत नजाकतीने वादन करून सुरांची आराधना करत रंगत गेलेले वादन रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले.

याच रागात किराणा घराण्याच्या गायकीचे वैशिष्ट्य दर्शविताना बासरीतून ‘बंगरी गयी मोरी’ ही बंदिश ऐकविली. त्यानंतर बासरीवर क्वचितच ऐकविला जाणारा राग रामदासी मल्हार अतिशय ताकदीने सादर करून रसिकांना मोहित केले. त्यांनी आपल्या मैफलीची सांगता राग हंसध्वनीमधील मध्यलय, रूपक, झाला, तीनताल सादर करून केली. या सादरीकरणात त्यांनी स्वत:ची निर्मिती असलेल्या ‘मंद्र बांसुरी’चे सूरही रसिकांना ऐकविले. सर्वच रागातील सूर बासरीच्या रचनेमुळे साकारता येत नाहीत ही मर्यादा पार करत अतिमंद्र पंचमापर्यंत जाणारे बासरीचे स्वर्गीय सूर ऐकून रसिक स्तिमित झाले. यशवंत वैष्णव यांनी तबलासाथ केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी कलापिनी कोमकली यांची गायन मैफल रंगली. त्यांनी मैफलीची सुरुवात राग नंदमधील बंदिशी सादर करून केली. ‘गोविंद बीन बजाये’ ही मध्य लयीतील बंदिश सादर करताना पंडित कुमार गंधर्व यांना विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी शिकविलेला नंद रागाचा अनोखा विस्तार रसिकांसमोर सादर केला. नंतर द्रुत लयीत ‘अजहुन आए शाम’ ही पारंपरिक रचना अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना आनंदित केले.

त्यानंतर पंडित कुमार गंधर्व यांनी राग नंदमध्येच रचलेली अनोखी मांडणी असलेली ‘अब तो आजा रे’ ही बंदिश सादर केली तेव्हा रसिकांनी त्यास भरभरून दाद दिली. त्यानंतर कलापिनी कोमकली यांनी मिश्र खमाजमधील ‘बांके सावरियाँ…’ ही ठुमरी सादर करून त्याला जोडून ‘राम बिन…’ ही रचना ऐकविली. खुला आवाज, दमदार ताना, स्वरांशी असलेला लगाव, गायनातील गती व लयीवर प्रभुत्व असणारा तसेच समजून उमजून भावपूर्णतेने केलेला स्वरविस्तार ऐकून रसिक भावविभोर झाले.

मैफलीत पुढे संत तुकाराम महाराज यांचा ‘माझे मज कळो येती अवगुण’ हा अभंग आणि ‘मुझे रे रघुवीर की सुद आए’ हे लोकभजन सादर केले. ‘जमुना किनारे मेरो गांव, सावरे सावरे…’ या कुमार गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेली सुप्रसिद्ध रचना सादर केली. मयंक बेडेकर (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, असे सांगून कलापिनी कोमकली म्हणाल्या, रामकाकांना आवडायचे तेच संगीत आज मी ऐकविले आहे. जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माझा हातभार लागणे रामकाकांना आवडेल या भावनेतून मी पुढाकार घेतला. सोलापूरचे सांस्कृतिक राजदूत, रसिकाग्रणी श्रीराम पुजारी यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी वर्षातून दोन दिवस सांगीतिक मैफल आयोजित केली जावी, असे सांगून कलापिनी कोमकली यांनी मैफलीची सांगता रसिकांच्या आग्रहास्तव ‘हे मनवा जी हो मगन हुआ’ या संत कबीर यांच्या रचनेने केली.

कलाकारांचा सत्कार श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सचिव ललिता दातार, सुयश गुरुकुलचे संस्थापक विश्वस्त केशव शिंदे यांनी केला तर सूत्रसंचालन मंजूषा गाडगीळ यांनी केले.