लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना : लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातून पाच लाख नागरिकांची त्यांच्या हस्ताक्षरात पत्रे पाठविण्याची मोहीम भाजपने राज्यात सुरू केली आहे. याकरिता परतूर येथे आयोजित पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात स्थानिक आमदार बबनराव लोणीकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  आमदार लोणीकर आपल्या भाषणात म्हणाले की, करोनाकाळात राजेश टोपे यांचा चेहरा दररोज दूरचित्रवाणीवर दिसायचा. ते नुसत्या गप्पा मारायचे. त्यांचे बोलणे सुरू झाले की लोक माना हलवायचे. तीन लाख लोकांचे मृत्यू महाराष्ट्रात झाले. पहिल्या दिवशी म्हणायचे, नरेंद्र मोदी करोना प्रतिबंधक लस देत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचे, आम्ही ग्लोबल टेंडर काढतो! अजित पवार यांनीही ग्लोबल टेंडर काढण्याची घोषणा केली होती.

केंद्र सरकारने लस दिली नसती तर १२ कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र अर्धा रिकामा झाला असता. टोपे यांचे वक्तव्य म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! ‘लबाड लांडगं सोंग करतय अन् लस आणण्याचं ढोंग करतंय’ असा हा प्रकार होता, अशी टीका आमदार लोणीकर यांनी केली. ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी या अनुषंगाने सांगितले की, राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून बबनराव लोणीकर आता टोपे यांच्यावर बिनबुडाचे, हास्यास्पद आणि धादांत खोटय़ा स्वरूपाची टीका करून स्वत:च्या पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. करोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांच्या कार्याची दखल राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर घेण्यात आलेली आहे. करोनाकाळात राज्यभर फिरून जनतेच्या आरोग्याची काळजी टोपे यांनी घेतली, हे सर्वाना माहीत आहे. जागतिक आरोग्य संघटना, निती आयोग आणि केंद्रीय आरोग्य विभागाने करोनाकाळात महाराष्ट्राने केलेल्या कार्याचा गौरव केला आहे.

 जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा राज्यात करोना चाचणीसाठी दोन-तीन प्रयोगशाळा होत्या. टोपे यांच्या प्रयत्नामुळे त्यांची संख्या पावणेचारशेपर्यंत पोहोचली. पावणेचार हजार रुग्णालयांमध्ये तीन लाख ६० हजारांपेक्षा अधिक खाटा करोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या. ऐन करोनाकाळात संपूर्ण राज्यभर फिरून टोपे यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. महाराष्ट्रातील काम पाहून देशातील अनेक मुख्यमंत्री टोपे यांच्याशी फोनवर चर्चा करीत असत. आयसीयू खाटा, व्हेंटिलेटर्स, औषधी आणि डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णवाहिका इत्यादींचा करोनाकाळातील तपशील द्यायचा तर मोठी यादी होईल. खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा करोनासाठी आरक्षित करण्याचा निर्णयही मोठा होता. करोनामुळे राज्यात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा शोध लोणीकर यांनी कुठून लावला, कुणास ठाऊक! हा आकडा सांगण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या आरोग्य विभागाकडून तरी माहिती घ्यावयास हवी होती.

‘ग्लोबल टेंडर’च्या संदर्भात आमदार लोणीकर यांचे वक्तव्य तर पूर्णपणे हास्यास्पद आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या बैठकीत अन्य राज्यांप्रमाणे करोना प्रतिबंधक लशीची मागणी केली होती. ही लस मिळण्यास उशीर झाला तर राज्यातील जनतेची काळजी म्हणून ‘ग्लोबल टेंडर’च्या माध्यमातून लस उपलब्ध करवून द्यायचे महाविकास आघाडीने ठरविले असेल तर त्यात वावगे काय? पर्याय तयार ठेवण्यात चुकीचे काय? केंद्र सरकारने लस उपलब्ध करवून दिल्याने त्याची गरज पडली नाही; परंतु लोणीकरांना मात्र काही तरी जुना विषय काढून राजकारण करायचे आहे.

– डॉ. निसार देशमुख, अध्यक्ष, जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस</p>

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babanrao lonikar criticism rajesh tope in jalna public welfare of plans ysh
First published on: 09-11-2022 at 00:02 IST