शिवसेना ( शिंदे गट ) आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून केलेल्या गौप्यस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणून मंत्रीपद कसे घेतलं आणि मिळालेली संधी कशी हुकली, याचा किस्सा गोगावले यांनी सांगितला आहे. तसेच, आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, असं गोगावलेंनी म्हटलं. यावर माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

अलिबागमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोगावलेंनी म्हटलं, “आमचे मुख्यमंत्री आम्हाला अडचणीत सापडलेले दिसले. म्हणून मी मंत्रपदापासून माघार घेतली. पण काय झालं? एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवतील. एक बोलतो राजीनामा देईन.”

“आपली एक सीट कमी होईल. म्हणून…”

“एकाला फोन करून विचारलं काय रे, संभाजीनगरला तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदं दिली. आम्ही तीनपैकी एकही मंत्रीपद घेत नाही. आम्ही थांबतो. पण, मी विचारलं तुला एवढी घाई कशाला? त्याला समजावलं. आता बायको बोलल्यावर काय करायचं? मी एकनाथ शिंदेंना म्हटलं त्याला देऊन टाका. मग म्हटलं दुसऱ्याला नारायण राणेंनी संपवायला नाही पाहिजे. आपली एक सीट कमी होईल. म्हणून म्हटलं त्यालाही द्या. मी थांबतो तुमच्यासाठी. आणि मी थांबलो तो आजपर्यंत थांबलो”, असा किस्सा भरत गोगावले यांनी सांगितला.

हेही वाचा : “महामानवांबद्दल कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये, याबद्दलची…”; शिंदे-फडणवीसांसमोर अजित पवारांचं वक्तव्य

“आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री”

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याप्रमाणे आमच्यासारख्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत,” असेही भरत गोगावले यांनी म्हटलं.

हेही वाचा : “भाजपाला लोकसभेच्या १५० जागाही जिंकता येणार नाहीत”, संजय राऊतांचा दावा

“प्रत्येकाने त्याग केला आहे”

‘आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मंत्री झाले आणि काही आमदारांसाठी मंत्रीपदाचा त्याग केला’ भरत गोगावलेंच्या या विधाबाबद्दल बच्चू कडूंना प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्र्यांबरोबर त्याची काय चर्चा झाली, याची मला माहिती नाही. पण, प्रत्येकाने त्याग केला आहे. त्यातूनच सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदेंबाबत प्रत्येकाच्या भावना घट्ट होत्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“‘मी थांबतो, दुसऱ्यांना मंत्री करा’ अशी भूमिका घेतल्याने…”

“काम करणारा व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिलं जातं. भरत गोगावले यांनीही त्याग केला आहे. त्यात काही नवल नाही. ‘मी थांबतो, दुसऱ्यांना मंत्री करा’ अशी भूमिका घेतल्याने भरत गोगावले मागे राहिले,” असेही बच्चू कडू यांनी सांगितलं.