गेल्या महिन्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीतील काही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच माजी मंत्री, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं वाटोळं होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते गोंदियात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“शरद पवार भाजपाबरोबर गेले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचे मोठे वाटोळं होईल. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात कोणी आडवं येऊ नये,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

हेही वाचा : “दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष बांधावा”, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर; म्हणाले…

‘शासन आपल्या दारी म्हणजे जनतेच्या नावाने सुरु केलेला नवीन जुमला आहे’, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबद्दल विचारल्यावर बच्चू कडू यांनी म्हटलं, “कधी न केल्याने सुप्रिया सुळेंना जुमला वाटत आहे.”

“राज्यात आज मजबूत सरकार”

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात आज एक मजबूत सरकार आहे. काही लोक दिवसा स्वप्न पाहतात. ‘दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे’, असं काही जण सांगतात.”

हेही वाचा : “मी पुन्हा येईन म्हटलं तर मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल”, पवारांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोणीही आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर…”

“होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे. पण, त्या खुर्चीचं रक्षण करण्यासाठी आमची नजर आहे. कोणीही आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम दोन उपमुख्यमंत्री करतील,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे”