बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणा यांनी माघार घेतली आहे. मी माझे शब्द मागे घेतो म्हणत रवी राणा यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बच्चू कडू यांनी या वादावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र बच्चू कडू आज अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एका दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाऊन खोके (पैसे) घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता.

हेही वाचा >> शिवसेनेतील फूट प्रकरण : घटनापीठापुढे आज सुनावणी

“आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत काही दिव्यांग बांधव असतील. लोकांचे काय मत आहे, हे या बैठकीत जाणून घेण्यात येईल. त्यानंतर आम्ही आमची भूमिका एका दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून जाहीर करू. आजच्या बैठकीची कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे. रक्ताचे पाणी करून आम्ही हे संघटन उभारलेले आहे. त्यामुळे कोणासमोरही झुकण्याचा प्रश्न येत नाही. काही लोकांना असे वाटते की आम्ही पदासमोर, पैशासमोर झुकू. मात्र आम्ही झुकणारे नाही. पैसा, पद आणि सत्तेसमोर आम्ही झुकणारे नाही. तसे असते तर आम्ही आरोप सहन केले असते,” असे बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा >> “…तर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” ‘अहंकारी राजा, विलासी राजपूत्र’ म्हणत आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

आम्ही दिव्यांगांना सोबत घेऊन लढा उभारला. मंत्री, आएएस अधिकाऱ्याच्या घरासमोर आम्ही आंदोलनं केलेली आहेत. जनता आणि सत्ता यांच्यामध्ये आपली भूमिका काय असते, याला महत्त्व असते. त्यामुळे आज आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत, असेदेखील बच्चू कडू यांनी सांगितले.

रवी राणा यांची माघार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर रवी राणा यांनी माघार घेतली आहे. “विचारांमध्ये मतभेद होत असतात. बच्च कडू आणि मी सरकारबरोबर आहोत. महाराष्ट्रात जनतेचा विकास, उन्नती आणि न्याय देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी काहीही विकास केला नाही, हा विषय मी संपवत आहे. माझ्या वक्तव्यानंतर मंत्री अथवा आमदार दुखावले असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो,” असे रवी राणांनी म्हटलं आहे.