छत्रपती संभाजीनगर : वाती वळणं हे बिनकाम्याचं काम, ही समज कधीपासून रुजलेली काय माहीत ? – पण कापसाच्या वातीचा उद्योग केला तर तो किती रुपयांचा असू शकेल ? उत्तर फार ओढून ताणून चार- पाच लाख रुपयांपर्यंतचा आकडा सांगू फार तर. पण ज्योती महेंद्र जवरास यांच्या वातीच्या उलाढालीचा आकडा आहे ३६ लाख रुपयांचा. आता त्यांनी हाताखाली चार जणांना रोजगार दिला आहे. वातीचे २१ प्रकार त्या विकतात. दर महिन्याची साधारणत: तीन ते साडेतीन लाखांची विक्री. श्रावण ते महालक्ष्मी या सणांच्या दिवसात कामाचा झपाटा चारपटीचा. रमाबाई बचत गटातून १० हजार रुपयांचं कर्ज घेऊन वातीचा उद्योग करू, असा विचार सांगितल्यावर त्यांच्यावर बहुतेक जणी हसल्या. फुलवात बनवायला शिकल्यावर पहिल्यांदा कापूस विकत आणला आणि सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्या वाती बनवत होत्या. आता फुलवातीबरोबर दोर वाती, वस्त्रमाळ, तूपमाळ, माळावस्त्र, नवरात्र वात, अखंड वात, वेणीवात अशा प्रकारच्या २१ प्रकारच्या वाती. प्रत्येकाची पॅकिंग वेगळी. प्रत्येक दुकानातून येणारी मागणी वेगळी. हा सारा उद्योग उभा राहिला तो बचत गटाला मिळालेल्या कर्जामुळे. दहा हजार रुपयांचं पतमानांकन पुढे २० हजार झालं. पुढे ते साडेतीन लाख आणि आता दहा लाख रुपयांची पत घेऊन पाच जणी वेगवेगळा व्यवसाय करत आहेत आणि बाकी चौघी जणी वात बनविण्याच्या व्यवसायात.

आता देवळाई परिसरात त्यांनी टुमदार बंगला बांधला आहे. नवऱ्याला एक दिवशी म्हणाल्या, ‘नोकरी सोडून वाती विकण्याच्या कामात मदत करा’. महेंद्र तेव्हा उदबत्ती विक्रीच्या व्यवसायात होते. बाजारपेठ माहीत होती. त्यांनी पत्नीचा सल्ला मानला. ते आता कधी दुचाकी तर कधी नव्याने घेतलेल्या चारचाकी गाडीतून फुलवाती विक्री करतात. मंदिराच्या भोवतालच्या दुकानात, होलसेल बाजारपेठेतून सुमारे तीन हजार विक्रेत्यांकडून त्याची विक्री होती. आता छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, पुणे सह जळगावपर्यंत त्यांच्या वातींची विक्री होती. ज्योतीने ज्योत प्रज्वलीत होत आहे. उलाढालीचा आकडा आणि नफा एवढा की, आता अन्य कोणते कर्ज घेण्याची गरज राहिली नाही. महेंद्र सांगत होते, वात ज्योत निर्माण करते. त्याचा प्रकाश आमच्या आयुष्यातही आनंद निर्माण करतो. बचत गटाच्या कर्जाबरोबर मेहनत घेतली की उद्योग उभा राहतो, असा दावा ज्योती आणि महेंद्र दोघेही करतात. महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठाडे म्हणाले, ‘अनेक महिला आता पायावर उभे राहिल्या आहेत. ज्योतीताई आणि त्यांचे पती यांनी जो व्यवसाय फारसा वाढणार नाही, अशी धारणा असणाऱ्या क्षेत्रात उद्योगाची उलाढाल वाढवत नेली.’

चिकाटीचा उद्योग काही वाती कापूस पिळून होतात. काही वाती फक्त बोटावर दोऱ्यासारख्या गुंडाळून कराव्या लागतात. तर काही वातीना तुपात भिजवावे लागते. वाती रंगवणे हेही वेळखाऊ काम असते. पण अशा कामातूनही उद्योग उभा राहू शकतो. फक्त त्यासाठी चिकाटी लागते. घराघरांत वाती वळता येणारी आजी कमी झाली आणि वातीचा व्यवसाय शहरी भागात बहरतो आहे. प्रत्येक जिल्ह्यात तो काही लाखात आहे. त्याचा एक ब्रॅन्ड ज्योती यांनी बनवला आहे.