Bachchu Kadu vs Radhakrishna Vikhe Patil on Farmers Loan Waiver : “जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला १ लाख रुपयांचं बक्षीस देईन”, अशी घोषणा माजी आमदार तथा प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. तसेच ते विखेंविरोधात आक्रमक होत म्हणाले, “मला विखे पाटील कुठे भेटले तर मी स्वतः त्यांची गाडी फोडेन.”
बच्चू कडू म्हणाले, “लोक तुम्हाला (राधाकृष्ण विखे पाटील) मारत नाहीत याबाद्दल लोकांचे आभार माना. मी तर म्हणतो, जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला मी एक लाख रुपयांचं बक्षीस देईन. मला ते कुठे भेटले तर मी त्यांची गाडी फोडणारच आहे. मला वाटतं विखे पाटलांनी अशी वक्तव्ये थांबवली पाहिजेत. आम्ही ही असली वक्तव्ये सहन करणार नाही.
विखे पाटील नेमकं काय म्हणाले होते?
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. कित्येक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात माजी मंत्री बच्चू कडू व इतर शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केलं होतं. सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. अशातच शुक्रवारी (७ नोव्हेंबर) एका कार्यक्रमात भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, शेतकरी कर्जबाजारी होतात आणि मग कर्जमाफी मागतात असं वक्तव्य केलं होतं.
विखे पाटील म्हणाले, “सोसायटीचं कर्ज काढायचं आणि मग कर्जबाजारी व्हायचं, कर्जबाजारी झाल्यावर कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्षे चालू आहे. तरी महायुती सरकारने जाहीर केलं आहे की १०० टक्के कर्ज माफ करणार आहोत.”
विखे पाटलांना उद्धव ठाकरेंचा टोला
विखे पाटलांच्या वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “राधाकृष्ण विखे-पाटलांच्या साखर कारखान्यांना आतापर्यंत किती वेळा कर्जमाफी मिळाली आहे, याचा त्यांनी पहिल्यांदा हिशेब मांडावा. त्यांचे घोटाळे जगजाहीर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही.”
