राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात गुप्त बैठक घेतली आहे. या भेटीनंतर अनेक राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवारांची नेमकी भूमिका काय आहे? ते भाजपाबरोबर सत्तेत सामील होणार का? याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहे. या भेटीबाबत स्वत: शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार माझा पुतण्या आहे, त्यामुळे मी वडिलकीच्या नात्याने भेट घेतली, असं विधान शरद पवारांनी केलं.

शरद पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर शिंदे गटाचे समर्थक आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवारांचं बोलणं आणि त्यांची प्रत्यक्ष कृती यामध्ये यामध्ये न समजणाऱ्या गोष्टी आहेत. ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. ते अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “अजित पवारांना मुळीच मुख्यमंत्री केलं जाणार नाही”, काँग्रेसच्या माजी खासदाराचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, “एकंदरीत आपण चित्र पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच संभ्रमात आहे. कारण खूप अनिश्चितता आहे. नेमक्या कृतीवर कुणीच येत नाहीये. अजित पवार पक्षातून फुटून बाहेर गेल्यानंतर त्यांना ज्याप्रकारे विरोध व्हायला पाहिजे होता, तसा विरोध होताना दिसत नाही. अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो बॅनरवर लावला जात आहे. या सर्व बाबींमुळे संभ्रम निर्माण होत आहे. पण शरद पवारही अजित पवारांबरोबर आले, तर महायुती अधिक मजबूत होईल.”

हेही वाचा- “…तर आम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवू”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांच्या भेटीबाबत शरद पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल विचारलं असता बच्चू कडू पुढे म्हणाले, “मला वाटतं की, शरद पवारांचं बोलणं आणि त्यांची प्रत्यक्षातील कृती यामध्ये न समजणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे, शरद पवार जे बोलतात, ते कधी करत नाहीत आणि जे करतात ते कधी बोलत नाहीत. असा एकंदरीत त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील अनुभव आहे. त्यामुळे शरद पवारांच्या स्पष्टीकरणातून काय समजावं? हे सांगता येत नाही.”