शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. ‘शिवगर्जना’ यात्रेच्या माध्यमातून शिवसेना नेते विविध मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अलीकडेच अमरावतीत सभा घेतली. या सभेतून अंधारे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. “देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत आहेत,” असं विधानही सुषमा अंधारे यांनी केला.

अंधारे यांच्या टीकेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचं नाव ‘प्रहार’ आहे. आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, “आमच्या पक्षाचं नाव ‘प्रहार’ आहे. बाकीच्या पक्षाचं नाव ‘प्रहार’ आहे का? आम्ही वार करतो.आम्ही फसत नाही. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जात नाही. आम्ही नुकताच १५० कोटींचा निधी मिळवला. यामध्ये रस्ते विकासासाठी कालच १२७ कोटी रुपये मंजूर केले. अचलपूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम आली आहे. मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे. आमची पंधरा वर्षे अशीच गेली. आम्ही सत्तेच्या बाहेर पडून आंदोलनं केली. भांडणं केली. त्याकाळात मतदारसंघ थोडा मागे राहिला. आता आपण चार प्रकल्प मंजूर केले आहेत. शेवटी मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा असतो.”

हेही वाचा- …तरच बारावी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुकलेल्या प्रश्नांचे सहा गुण मिळतील; परीक्षा मंडळाचा निर्णय

“राहिला प्रश्न गुवाहाटीला जाण्याचा… तर गुवाहाटीला जायचं की नाही? हे कोण ठरवणार? गेली २० वर्षे आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे कुठे जायचं आणि कुठे नाही? हे आम्ही ठरवणार… आम्ही स्वत:च्या अंगावर केसेस घेतल्या. आम्ही लोकांचा मार खाल्ला. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर बसायचं? हे आता तुम्ही सांगणार का?” असा सवाल बच्चू कडूंनी विचारला.

हेही वाचा- “संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, उद्या जर…”; उद्धव ठाकरेंचा ‘डॉक्टर’ असा उल्लेख करत संदीप देशपांडेंची खोचक टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चू कडू पुढे म्हणाले, “शिवसेनेचा आणि आमचा संबंध कुठे आला इथे.. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आमचा स्वत:चा पक्ष आहे. स्वत:ची मेहनत आहे. आमची स्वत:ची पानटपरी आहे. ही पानटपरी कुठे लावायची, हे आम्ही ठरवू… त्यामुळे आम्हाला कुणी गद्दार म्हणण्याचं शहाणपण शिकवू नये. आम्ही गद्दारी केली नाही. माझ्या प्रचारासाठी सभा घ्यायला उद्धव ठाकरे आले नव्हते. तरीही तुम्ही आम्हाला गद्दार कसं म्हणू शकता?”