सोलापूर : एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिलेली किंमती ऐवज असलेली पिशवी बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशा स्वरूपात परत मिळाली. सोलापूर एसटी बसस्थानकात ही पिशवी परत घेताना त्या महिला प्रवाशासह तिच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले.

त्याचे असे झाले की, ललिताबाई गोविंदराव भोसले (वय ३०, रा. खानापूर, ता. बसवकल्याण, जि. बीदर, कर्नाटक) या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद-सोलापूर या एसटी बसमधून आपल्या दोन कुटुंब सदस्यांसह प्रवास करीत होत्या. नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी चुकून अनावधानाने एसटी बसमध्येच राहिली होती. हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्या अक्षरशः हतबल झाल्या होत्या. पिशवीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती. तसेच त्यांचा भ्रमणध्वनीही पिशवीतच होता. सुदैवाने ही पिशवी बेवारस स्थितीत एसटी वाहक महेश विकास माने यांना सापडली. त्यांनी सापडलेली पिशवी एसटी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली.

हेही वाचा – शैक्षणिक अभ्यासक्रमातून आता निवडणूक प्रक्रियेचे धडे… नेमके होणार काय?

हेही वाचा – मराठा आरक्षण: मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमवर एकनाथ शिंदेंची जाहीर विनंती, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिशवीत पाहिले असता भ्रमणध्वनीसह सोने-चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता. वाहक आणि चालकाने ही किंमती पिशवी सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचताच आगार प्रमुख अशोक बनसोडे यांच्या हवाली केली. पिशवीतील भ्रमणध्वनीच्या आधारे ललिताबाई भोसले यांच्याशी संपर्क झाला. तेव्हा त्यांच्यासह भोसले कुटुंबीयांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सोलापूर एसटी बसस्थानक गाठले आणि आगारप्रमुख बनसोडे यांची भेट घेतली. योग्य खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या समक्ष संपूर्ण ऐवजासह किंमती पिशवी ललिताबाई भोसले यांना जशीच्या तशी सुपूर्द करण्यात आली. यावेळी बसवाहक महेश माने व चालक मिलिंद चंदनशिवे यांच्या प्रामाणिकपणाचे भोसले कुटुंबीयांनी कौतुक करीत बक्षीस देऊ केले. परंतु दोघांनी नम्रपणे नकार दिला. एसटी वाहक महेश माने (वय ३०) हे मूळ शेटफळ (ता. मोहोळआ) येथील राहणारे असून गेल्याच वर्षी त्यांची एसटी वाहकपदावर नियुक्ती झाली होती.