वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक आक्रमक झाली असून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर मनसे नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही”.

‘तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी’: मनसेच्या महामोर्चात मुंबई, पुणे, ठाण्यासहीत नाशकात शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

दरम्यान पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “पोलिसांना त्यांचं काम करावं लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सरकारचे आदेश आहेत. लोक मरण्यापेक्षा वाचलेली बरी म्हणून ते आमची काळजी घेत आहेत. उलट आम्ही त्यांचे आभार मानतो. पण आम्हीदेखील स्वत:च्या जीवाची काळजी घेत आहोत”.

‘हा सामान्यांच्या नेतृत्वातला मोर्चा आहे त्यामुळेच शांत आहे. यानंतर सरकार काहीतरी निर्णय घेईल,” अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे. तसंच राज ठाकरे पुढील भूमिका जाहीर करतील असंही सांगितलं.

ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या निमित्ताने मनसेने दादर, माहीम परिसरात राज्य सरकारच्या घोषणेवरुन टोला लगावत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’ असे होर्डिंग लावले होते. राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून वाढीव वीजबिलाचा मुद्दा मांडला आहे. यासाठी त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. पण अद्यापही तोडगा न निघाल्याने मनसे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bala nandgaonkar mns protest light bill raj thackeray bandra mumbai police sgy
First published on: 26-11-2020 at 12:14 IST