अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी, चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागांवर नव्याने नियुक्त्या करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पक्षनिरीक्षक शरद आहेर हे दोघे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी ही माहिती दिली. प्रदेशाध्यक्षांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या निरीक्षकपदी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांची नियुक्ती केली आहे. ते प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यामुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षाही वाघ यांनी व्यक्त केली. या दौऱ्यात अखिल भारतीय काँग्रेस समितीने दिलेल्या ‘संविधान बचाव’ मोहिमेच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी या बैठका महत्त्वाच्या असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाही वाघ यांनी केले आहे.
बाळासाहेब थोरात व शरद आहेर यांचा दौरा पुढीलप्रमाणे- रविवारी (दि. २७) सकाळी १० वा. राहुरी, दुपारी १२ वा. पारनेर, दुपारी ३ वा. अहिल्यानगर शहर व तालुका. यावेळी शहर व जिल्हा ब्लॉक समिती अध्यक्ष पदासाठी मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे तसेच शनिवारी (दि. ३) सकाळी १० वा. श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव व पाथर्डी. बुधवारी (दि. ७) सकाळी १० वा. कोपरगाव, राहता, संगमनेर, अकोला व दि. ९ मे रोजी सकाळी १० वा. श्रीगोंदा, कर्जत व जामखेड.