विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा काँग्रेसने नामंजूर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत थोरात यांनी हा राजीनामा दिल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्याशी थोरात यांनी आपल्या नाराजीबाबत सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी आज (१५ फेब्रवारी) आपल्या नाराजीवर भाष्य केले आहे. मी नाराज नसल्याचे ते म्हणाले आहेत.

मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही

“अरे अरे अरे…मी नाराज होतो, हे कोणी सांगितले. मला माध्यमांकडूनच समजत आहे की मी नाराज होतो. मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही. पत्रव्यवहार हा प्रत्येक संघटनेत चालतो. तो मीदेखील केला,” असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच नाही

१२ फेब्रुवारी रोजी बाळासाहेब थोरात आणि एच के पाटील यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर थोरात यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला, असे एक के पाटील यांनी सांगितले होते. “बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच नाही. मी बाळासाहेब थोरात यांना रायपूरमधील अधिवेशनास हजर राहण्याची विनंती केली आहे. आमच्यातील जे काही प्रश्न आहेत, त्यावर योग्य तो मार्ग काढला जाईल,” असे एच के पाटील यांनी स्पष्ट केले होते.

काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याच बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला होता. “प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते.