संगमनेर : दुष्काळी तालुका ते प्रगतिशील तालुका या वाटचालीमध्ये दूध व्यवसायाचा मोठा वाटा आहे. तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. या व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. दूध व्यवसाय सहकार व ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे बाजारपेठ फुलली असून, या समृद्धीचा पाया शेतकरी व उत्पादक आहे. गुणवत्तापूर्ण दूध व उपपदार्थ हे राजहंस दूध संघाचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या आज झालेल्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग घुले, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, लहानभाऊ गुंजाळ, आर.बी राहणे, इंद्रजीत थोरात, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, दूध व्यवसाय अत्यंत कष्टाचा व मेहनतीचा आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध व्यवसायाचा तालुक्यात पाया घातला आणि अर्थव्यवस्था सक्षम करण्यात या व्यवसायाने मोठा वाटा उचलला. गुणवत्तापूर्ण दूध आणि उपपदार्थ हे वैशिष्ट्य राहिले आहे. सहकारी दूध संघामुळे खासगी संघांवर अंकुश आहे. त्यांना मनमानी करता येत नाही. असे असतानाही सहकारी दूध संघांना अनेक निर्बंध आहेत, ते खासगी संघांना नाही. अनेक ठिकाणी आता पनीर बनावट पद्धतीने तयार केले जात आहे. पनीर तयार करण्यासाठी कमीत कमी तीनशे रुपये प्रति किलो खर्च येतो मग दीडशे रुपये किलोमध्ये मिळणारा पनीर कसे असेल यावर तुम्हीच विचार करावा.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाची व इतर सहकारी संस्थांची वाटचाल दिशादर्शक आहे. दिवसेंदिवस या सहकारी संस्थापुढील प्रश्न बदलत चालले आहेत. दूध व्यवसायामध्ये अस्थिरता आहे. देशमुख म्हणाले की, दूध संघाची आर्थिक उलाढाल ५५१ कोटींची झाली आहे. यामुळे तालुक्याच्या आर्थिक विकासात मोठ्या सहभाग नोंदवला आहे.
दूध तालुक्याची वाटचाल मोठी कौतुकास्पद राहिली आहे. परंतु मागील एक वर्षापासून तालुक्यात वातावरण बदलले आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. दररोज अटकपूर्व जामीन घ्यावा लागत आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, मात्र अनेक जलदूत आता पुढे यायला सुरुवात झाली आहे. आज इतरांना त्रास आहे, उद्या तुम्हालाही होईल. ज्यांचा संबंध नाही त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी तसेच तालुक्याची समाजव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जागृत रहा असे आवाहन थोरात यांनी केले.