काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपामध्ये मी प्रवेश केला तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी एकट्याने खिंड लढवू अशी गर्जना केली होती. मात्र, आता त्यांनी खिंड सोडून पळ काढला. असा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना लगावला होता.

यावर संगमनेरमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी, “अगोदर हे पळाले, नंतर मी खिंड लढवली. २०१९ मध्ये अगोदर हे पळाले. ते खरंतर विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्रातील काँग्रेस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी त्या पद्धतीने महाराष्ट्राची काँग्रेसच तर सांभाळली नाही. परंतु जेव्हा लढण्याची वेळ आली त्यावेळी ते पळून गेले. आता ते माझ्यावर कशाला आरोप करत आहेत. अशा शब्दांमध्ये विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.”

याशिवाय, “या सर्व पक्षांतर्गत चर्चा असतात आणि या अखंडपणे सुरू असतात, कोणत्याही पक्षात सुरूच असतात. फक्त आमच्या या चर्चेला तुम्ही खूपच चांगली प्रसिद्धी दिली. तुमचे आभार मानले पाहिजे. जे झालं त्याबाबत माझ्या ज्या भावना होत्या त्या मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या होत्या. त्यांनी त्या पद्धतीने दखल घेतली आहे. एच के पाटील काल आले होते आमची चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या पक्ष पुढे जाण्यासाठीच आहे.” असंही थोरात यांनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकुल वातावरण आज आहे. या वातावरणात ज्या निवडणुका होतील त्या महाविकास आघाडीला चांगलं यश देणाऱ्या ठरतील.” असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते विखे पाटील –

“२०१९ मध्ये काँग्रेस वाचवण्यासाटी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असं सांगणारे व एकाकी खिंड लढवणार असं म्हणत मिरवणारे आता का हतबल झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानलं आहे.” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते.