संगमनेर : भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने आनंदाने राहत आहेत. मानवता हाच आपला धर्म आहे. मात्र काही लोक भगवा, हिरवा, निळा असे ध्वज घेऊन जातीभेद निर्माण करू पाहत आहेत. अशा शक्तींना रोखत प्रत्येकासाठी तिरंगा ध्वज, देश आणि राज्यघटना महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. नाशिक पदवीधर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सरपंच श्वेता मंडलिक, उपसरपंच गणेश शिंदे, शैला देशमुख, गुलाब शेख, माजी सरपंच सवरग्या शिंदे,अरुण गुंजाळ, लतीफ बागवान, रमेश गुंजाळ, राजेंद्र देशमुख, अकबर शेख यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भारतामध्ये विविधता आहे. तिरंगा ध्वजामध्ये भगवा, हिरवा, सफेद आणि निळा रंग आहे त्यामुळे आपली प्राथमिकता तिरंगा ध्वज, देश आणि राज्यघटना असली पाहिजे. विविधता व एकता जपताना सर्व जाती धर्माच्या लोकांनी मानवता धर्म सांभाळायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदत होते. मराठा हा शब्द एका जातीसाठी नसून महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असून इंग्रजांविरुद्ध लढणारे उमाजी नाईक हे क्रांतिवीर होते. सर्व महापुरुष,संत, समाज सुधारक हे एका जातीचे नसून ते सर्वांचेच आहेत ही भावना आपण जोपासली पाहिजे.

आपण हा तालुका एक कुटुंब म्हणून सांभाळताना अनेक कामे केली. मात्र सध्या समाज माध्यमातील भूलथापांमुळे लोक कामे विसरत असल्याची खंत व्यक्त करताना एकेकाळी दंगलीचे शहर असलेल्या संगमनेरला शांतता, सुव्यवस्थेचे शहर आपण बनवले. मागील काही काळापासून शहरात आणि तालुक्यात दादागिरी आणि दहशत वाढत असल्याची भीती व्यक्त करतानाच पैशाच्या जोरावर काही मंडळी राजकारण करू पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

आमदार तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी ते विकसित तालुका हा प्रवास संगमनेरचा राहिला आहे. प्रवरेचे पाणी उचलण्याचा हक्क स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी जनतेला मिळवून दिला. तर बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. ९ लाख लिटर दूध उत्पादन आणि आर्थिक समृद्ध असलेल्या तालुका बनवला हे विसरता कामा नये. त्यांनी चाळीस वर्षे जपलेली सुसंस्कृत परंपरा आपल्याला जपायची असल्याचेही ते म्हणाले.