राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात बलाढय़ म्हणून समजल्या जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  खासदार राजू शेट्टी यांचेच खंदे समर्थक असलेल्यांनी राज्यातील प्रमुखांची बैठक पंढरपूर येथे मुरारजी कानजी धर्मशाळेत घेऊन राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना जोरदार धक्का देऊन पंजाबराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेची आज स्थापना केल्याची घोषणा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली. यामुळे शेतकरी संघटनेत फूट पडली असून आता या संघटनेसह नवीन चार शेतकरी संघटना तयार झाल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ओळख ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या ऊस दरासाठी आक्रमकपणे आंदोलन करून सरकारला आपल्या मागणीप्रमाणे भाव जाहीर करण्यास भाग पाडल्यामुळे त्यांची संघटना सर्वत्र प्रसिध्द आहे. २ वर्षांपूर्वी स्वाभिमानीने आंदोलन इतके तीव्र केले की ऊस दरासाठी प्रसंगी एस.टी.बस, वाहनांना लक्ष्य केले होते. त्यावेळी आंदोलन करताना दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
ज्या साखर सम्राटांविरोधात ऊस दरासाठी आंदोलन केले  त्याच साखर सम्राटांना विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली. त्यामुळे शेतकरी वर्ग त्यांच्यावर मनापासून नाराज होता. त्याचा परिणाम शेतकऱ्यांनी  विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दाखवून दिला. स्वाभिमानीचे गेल्यावेळी २ आमदार विधानसभेत होते. यावेळी स्वाभिमानीचा एकही साखर सम्राट उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळेच स्वाभिमानीतील शेतकरी कार्यकत्रे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यावर नाराज होते. शेतकरी संघटनेचा उपयोग या दोघांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी केल्याने त्यांच्या संघटनेतून फारकत घेऊन त्यांचेच खंदे समर्थक समजले जाणारे पंजाबराव पाटील, जयंत बगाडे यांनी बाहेर पडून केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज ‘बळीराजा शेतकरी’ संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली.
गेल्या वर्षी स्वाभिमानीने ऊस परिषदेत ३ हजार रूपये पहिली उचल मागणी केली होती. परंतु यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही भाजपप्रणित सरकारमध्ये सामील असल्याने त्यांनी यावेळी मात्र ३ हजारऐवजी २ हजार ७०० रूपयांची मागणी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे नाराज आहेत. स्वामिनाथन समितीचा अहवाल हा उत्पादन खर्चावर दर मिळावा अशी शिफारस केली असताना शेतकरी संघटनेने त्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे, यावरूनच शेतकरी संघटनेतील राजू शेट्टी खंदे समर्थक समजल्या जाणाऱ्यांनी दरावरून न पटल्याने व शेतकरी संघटना राजकीय दावणीला बांधल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी कार्यकर्त्यांना एकत्र करून बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली. लवकरच संघटनेचे राज्यभर पदाधिकारी व प्रमुख निवडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सुरूवातीला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवून शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर देण्यासाठी राज्यात फार मोठे आंदोलन केले. पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढून त्यांनी आघाडी सरकारला नमते घेण्यास भाग पाडले होते. परंतु राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेचा वापर राजकीय स्वार्थासाठी केल्याने त्यांचेच समर्थक असलेले बी.जी.पाटील, पंजाबराव पाटील, जयंत बगाडे, सत्तार पटेल आदि निष्ठावंत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका न पटल्याने त्यांनी ज्या पंढरीतून राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या दरप्रश्नी पदयात्रा काढून शासनाला हैराण केले होते. त्याच पंढरी नगरीत रविवारी राजू शेट्टींचे समर्थक असलेले पंजाबराव पाटील सातारा यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजकीय धक्का देऊन बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केल्याची घोषणा पंढरपुरात केली.
या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रमुख म्हणून पंजाबराव पाटील सातारा तर महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून सत्तार पटेल लातूर यांची निवड केली तर याचबरोबर बारा जणांची समिती गठित करून पंढरपूरचे बागल, मंगळवेढय़ाचे गण पाटील यांच्यासह इतर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे सदस्य म्हणून निवड केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baliraja farmers organization established
First published on: 10-11-2014 at 03:40 IST